भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुबईत दाखल झाला आहे. तो 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सराव सुरू करणार आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ 2020 च्या हंगामात या लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. दुखापतीनंतर पाच महिने पूर्ण आराम केल्यानंतर तो खेळात परतत आहे. मार्चमध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. यावर्षी 8 एप्रिल रोजी त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती.
दिल्ली कॅपिटल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “होय, श्रेयस आधीच दुबईला पोहोचला आहे आणि विलगीकरणाशी संबंधित सर्व प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण सुरू करेल. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या महिन्याच्या अखेरीस दुबईला जाईल. श्रेयसला संघासोबत कॅम्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण लय आणि फिटनेस मिळवायचा आहे म्हणून त्याने आधीच प्रशिक्षण सुरू करण्याचे ठरवले आहे.”
श्रेयससोबत त्याचे बालपण प्रशिक्षक प्रवीण आमरे आहेत, जे त्याला सरावासाठी मदत करतील. ते दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचे प्रशिक्षक देखील आहेत. सूत्राने सांगितले की, “जोपर्यंत संघ आणि सहकारी गोलंदाज उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्याला प्रवीण आमरे मदत करतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार बाहेरचा कोणताही गोलंदाज सरावात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रवीण श्रेयसला थ्रोडाउनमध्ये मदत करतील”.
“कोविडमुळे भारतात चांगल्या सरावासाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे. युएईला जाण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघ भारतात पाच ते सहा दिवस विगलीकरणात ठेवण्यात येईल. यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाची वेळ किमान 10 दिवसांनी पुढे जाईल. परंतु श्रेयस आता वेळेचा सदुपयोग करू शकतो आणि स्पर्धा सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी मुख्य संघात सामील होऊ शकतो,” असे सूत्राने सांगितले.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, एका आठवड्याच्या प्रदीर्घ तपासणीनंतर मर्यादित षटकांच्या भारतीय संघाच्या श्रेयसला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने मागील हंगामात आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. परंतु सध्या युएईत आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात संघाची धुरा सांभाळणारा रिषभ पंत दिल्लीच्या कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यता आहे.
आयपीएलचे उर्वरित 31 सामने 27 दिवसांमध्ये खेळले जातील, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने उर्वरित पर्वाची सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
डीआरसाठी आख्खा संघ जमतो, इकडं हसून माझं पोट दुखतं; इंग्लंडच्या दिग्गजाकडून भारताची थट्टा
सामना सुरू असताना लॉर्ड्सच्या बाल्कनीत रवी शास्त्री घेत होते डुलक्या, फोटो होतोय तुफान व्हायरल
गोलंदाजीचा भरपूर अनुभव असूनही बुमराहकडून ‘घोडचूक’, शेवटचे षटक टाकायला लावली तब्बल १५ मिनिटे