रविवारी (२२ ऑगस्ट) भारतभरात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या सणानिमित्त अनेक बहिण-भावांनी एकत्र येत मजा केली. तर, अनेकांना एकमेकांची प्रत्यक्ष भेट घेता न आल्याने सोशल मीडियावरुन, फोनद्वारे शुभेच्छा देण्यात आली. यादरम्यान, अनेक व्हिडिओ, फोटो दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. भारताचा सलामीवीर शिखर धवनचा देखील असाच एक व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे.
सध्या शिखर धवन सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे व्हिडिओ, फोटो पोस्ट करत असतो. त्याने रविवारी देखील रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर आपल्या बहिणींसोबत प्रभुदेवाचे प्रसिद्ध गाणं ‘उर्वशी उर्वशी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये शिखर आपल्या ६ बहिणींच्या मध्ये उभा असलेला दिसत आहे. त्याने पांढरी पँट आणि पिवळ्या रंगाच्या टी-शर्टसह गॉगल घातला आहे. तसेच त्याच्या बहिणींनी भारतीय आणि वेस्टर्न वेष परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.
लवकरच होऊ शकतो युएईला रवाना
शिखर सध्या घरी असून तो लवकरच युएईमध्ये जाऊ शकतो. आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईमध्ये पार पडणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघ हळूहळू युएईमध्ये पोहचत आहेत. शिखर धवन प्रतिनिधित्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातील काही खेळाडू देखील दुबईला पोहचले आहेत.
श्रीलंका दौऱ्यात भारताचे नेतृत्व
शिखरने नुकतेच जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व केले होते. भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने शिखरकडे विराट कोहली, रोहित शर्मा अशा वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
या दौऱ्यात भारतीय संघाला संमिश्र यश मिळाले. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ च्या फरकाने विजय मिळवला, तर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ ने पराभव स्विकारला.
महत्त्वाच्या बातम्या –
“लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात”, अजिंक्य रहाणेचे टीकाकारांना सडेतोड उत्तर