दुबई। काल(२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२० मधील दुसरा सामना पार पडला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये पंजाब संघावर मात केली.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी अशा चुका केल्या ज्यामुळे सर्व चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ दंग झाले. पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या तीन षटकांत महत्वाचे तीन फलंदाज गमावले. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि शिमरॉन हेटमायर या तिघांनीही पहिल्या ३ षटकांत विकेट्स गमावल्या.
दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका सामन्याच्या दुसऱ्याच षटकात बसला. मोहम्मद शमीच्या बाऊन्सरवर धवनने पूलशॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तो शॉट चुकला, पण चेंडू यष्टीरक्षक केएल राहुलच्याही हातातून सुटला आणि थोडा लांब गेला. धवनला वाटलं एक धाव मिळेल पण पृथ्वी शॉ पळालाच नाही. बाद झाल्यानंतर धवनने अत्यंत निराशाजनकपणे पृथ्वी शॉला काहीतरी म्हणाला, आणि खाते न उघडताच तो पॅव्हिलियनमध्ये परतला.
धवनच्या बाद झाल्यानंतर शॉनेही विकेट गमावली. शॉने चौथ्या षटकात शमीच्या चेंडूवर हवेत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू लॉंग ऑनवर उभा असलेल्या ख्रिस जॉर्डनने त्याचा सहज झेल घेतला.
यानंतर चौथ्याच षटकात शमीने दिल्लीला तिसरा झटका दिला. शिमरोन हेटमायर शमीच्या शानदार आउट स्विंगवर शॉर्ट कव्हरवर मयंक अगरवालला झेल देऊन बसला, दिल्लीने आपल्या महत्वपुर्ण ३ विकेट्स अवघ्या १३ धवांत गमावल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाला पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाही आणि त्यांनी पहिल्या ६ षटकांत केवळ २३ धावा केल्या.
परंतू १५८ धावांचा पाठलाग करताना पंजाबने सामना बरोबरीत आणून सोडला, आणि या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाली, परंतु यामध्ये पंजाबला वर्चस्व गाजवता आले नाही. आणि त्यामुळे हंगामातील पहिला सामना त्यांना गमवावा लागला.