नवी दिल्ली । पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर जेव्हाही क्रिकेटच्या मैदानावर उतरत होता, तेव्हा त्याच्यावर संपूर्ण क्रीडाजगताचे लक्ष असायचे. परंतु आता निवृत्तीनंतरही अख्तर चर्चेचा विषय ठरत आहे.
सोमवारी (८ जून) अख्तरने एका सोशल मीडियाशी बोलताना भारतीय संघाच्या खेळाडूविषयी मोठा खुलासा केला. ते ऐकून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसेल. तो म्हणाला, दांबुलामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मारायचे होते. त्यासाठी मी त्याच्या हॉटेलच्या खोलीची बनावट चावीही बनवली होती.
अख्तरचा मोठा खुलासा
आशिया चषक २०१० दरम्यान अख्तर आणि हरभजनदरम्यान शाब्दिक चकमक झाली होती. त्या घटनेची आठवण सांगत अख्तरने (Shoaib Akhtar) हॅलो ऍपशी बोलताना खुलासा केला. तो म्हणाला, “दांबुलामध्ये खेळताना मला हरभजनचा खूप राग आला होता आणि मी त्याला मारण्यासाठी त्याच्या खोलीत गेलो होतो. मी त्याच्या खोलीची बनावट चावीही बनवली होती. परंतु मला तो भेटलाच नाही. जर त्यादिवशी हरभजन भेटला असता, तर मी त्याला खूप धुतले असते.”
पीसीबीवर लावला गंभीर आरोप
“पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि पाकिस्तानच्या कर्णधाराने मला २००५ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतर कोणत्यातरी खेळाडूने मुलीशी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माझे नाव माध्यमांमध्ये आले होते. पीसीबीला माहीत होते, ते कोणी केले आहे. परंतु तरीही त्यांनी आतापर्यंत ते आरोप मागेही घेतलेले नाहीत,” असे पीसीबीवर आरोप करत अख्तर म्हणाला.