भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात पहिले दोन दिवस भारताचा दबदबा होता मात्र तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने उत्तम गोलंदाजी करत भारतीय संघाला केवळ ३६ धावांवर बाद केले.
या सामन्यात अनेक क्रिकेट पंडितांच्या मते पहिल्या डावात विराट कोहलीचे धावबाद होणे हा टर्निंग पॉइंट ठरला . अजिंक्य व विराटची उत्तम भागीदारी होत असताना अजिंक्यचा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला व विराट धावबाद झाला. या नंतर संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलले व पुढील काही षटकांतच पूर्ण भारतीय संघ २४४ धावांवर बाद झाला. विराटच्या धावबाद होण्याने अनेक क्रिकेट रसिकांनी अजिंक्यला सोशल मिडियातून ट्रोल करण्यास सुरुवात केली. या वेळी पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील अजिंक्यवर टीका केली आहे.
सामन्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनल वर बोलतांना अख्तर म्हणाला , “ज्याप्रकारे अजिंक्यने विराटला धावबाद केले ते एक प्रकारे त्याचा जीव घेण्यासारखेच होते. विराटने तिथे चांगल्या धावा केल्या असत्या तर सामन्याचे चित्रच वेगळे असते.”
भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “भारताने पहिल्या डावात याच गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध उत्तम कामगिरी केली . मला नाही माहित दुसऱ्या डावात असे काय झाले की भारतीय संघाने आपली खेळण्याची शैली बदलली. भारतीय संघाने हेजलवूड आणि कमिंस समोर एकदमच सरेंडर केले.”
भारतीय संघाने दुसऱ्या डावात केलेल्या खराब फलंदाजीमुळे त्यांना ८ विकेट्सने हा सामना गमवावा लागला. त्यामुळे आता ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यातच विराट कोहली पालकत्व रजेमुळे उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे. अशावेळी संघाची बुडती नौका तारून नेण्याचं दायित्व उर्वरित मालिकेसाठी कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला पार पडावे लागेल.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– वरिष्ठ मुंबईकरानेच धरले रहाणेला धारेवर; म्हणाला
– ऐतिहासिक पराभवानंतर आली विराटची प्रतिक्रिया; यांना धरले पराभवासाठी जबाबदार