देशात सध्या दुलीप ट्रॉफीची चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे, यंदा या देशांतर्गत स्पर्धेत भारतीय क्रिकेटचे अनेक सुपरस्टार खेळत आहेत.
दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला 12 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यामध्ये आयपीएल 2024 विजेता कर्णधार श्रेयस अय्यरचा संघ पुन्हा एकदा पराभूत झाला. महत्त्वाचं म्हणजे, भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला अय्यर फलंदाजीतही कोणतीच कमाल करू शकला नाही. त्यामुळे त्याला भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.
2024 दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया डी संघाचं नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर कॅप्टन्सीसह फलंदाजीतही फ्लॉप ठरला. इंडिया ए संघानं त्याच्या संघाचा 186 धावांनी पराभव केला. इंडिया ए संघाची कमान मयंक अग्रवालच्या हाती आहे. बीसीसीआयची या स्पर्धेवर विशेष नजर आहे. येथे चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी कसोटी मालिकांसाठी टीम इंडियात स्थान मिळू शकतं.
जर आपण श्रेयस अय्यरबद्दल बोललो, तर तो इंडिया डी संघासाठी पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र तो सातव्या चेंडूवर खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदनं आकिब खानच्या हाती झेलबाद केलं. दुसऱ्या डावात अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्यानं 55 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीनं 41 धावा केल्या. मात्र तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
या सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन देखील अपयशी ठरला. तो श्रेयस अय्यरच्या संघाचाच भाग आहे. सॅमसननं पहिल्या डावात केवळ 5 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून 45 चेंडूत 40 धावा आल्या. यादरम्यान सॅमसननं 3 चौकार आणि 3 षटकार लगावले.
या सामन्यात इंडिया ए संघानं पहिल्या डावात 290 धावा केल्या होत्या. अष्टपैलू शम्स मुलानीनं सर्वाधिक 89 धावांची खेळी खेळली. तर तनुष कोटियननं आठव्या क्रमांकावर 53 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंडिया डी संघ पहिल्या डावात केवळ 183 धावाच करू शकला. इंडिया ए नं आपला दुसरा डाव 380 धावांवर घोषित केला. संघाकडून प्रथम सिंह आणि तिलक वर्मा यांनी शतकं झळकावली. प्रत्युत्तरात, इंडिया डी संघ दुसऱ्या डावात 301 धावांवर ऑलआऊट झाला.
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलरची दुलीप ट्रॉफीत हवा! अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा गोलंदाज
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल
जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!