चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने शानदार शतक झळकावले. यादरम्यान चेन्नईच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या गिलच्या वडिलांनीही शतकाचा आनंद लुटला. गिलने शतक पूर्ण केल्यावर त्याच्या वडिलांनी त्याच्या जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत कौतुक केले. दुसऱ्या डावात तीन बळी लवकर गेल्यानंतर गिलने रिषभ पंतसह डावाची धुरा सांभाळली. गिलने 119 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 10 चौकार व चार षटकार सामील होते.
गिलने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 515 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात गिलशिवाय पंतनेही महत्त्वाची भूमिका बजावली. पंतने 109 धावांची शतकी खेळी खेळली. भारतीय संघाने 67 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या, तेव्हा असे वाटत होते की भारतीय डाव स्वस्तात आटपेल. मात्र, या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. गिलचे कसोटी क्रिकेटमधील हे सलग दुसरे शतक आहे. याआधी त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातही शतक झळकावले होते. त्याच मालिकेत गिलने दुसऱ्या कसोटीतही शतक ठोकले होते.
View this post on Instagram
गिलसाठी 2024 हे वर्ष कसोटीच्या दृष्टीकोनातून उत्तम राहिले आहे. गिलचे हे या वर्षातील तिसरे कसोटी शतक ठरले. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा तो फलंदाज आहे. त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी 2 शतके आहेत. गिलने आपल्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमलाही मागे टाकले आहे. 2022 नंतर, गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 12 शतके झळकावली आहेत आणि तो पहिल्या क्रमांकावर आला आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबर आझमच्या नावावर 11 शतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या चेन्नई कसोटीतील शतकी खेळीनंतर प्रेयसीची रिऍक्शन व्हायरल
आधी नाबाद, मग बाद आणि पुन्हा नाबाद; पंचांच्या निर्णयामुळे भर सामन्यात उडाला गोंधळ
VIDEO: रूतुराज गायकवाड बनला ‘सुपरमॅन’ पकडला अप्रतिम झेल