भारतासाठी कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. अशीच एक सुवर्णसंधी भारताच्या सलामीवीर शुबमन गिलला मिळाली आहे. १८ जूनपासून सुरु होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून गिल खेळणार आहे. या सामन्याचे महत्व त्याने नुकतेच एका मुलाखतीत विशद केले. त्याचा आयपीएल संघ असलेला कोलकाता नाईट रायडर्सला त्याने ही मुलाखत दिली.
भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने न्यूझीलंड विरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील त्याचा काय हेतू हे सांगितले आहे. हा सामना त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सामना आहे, असे विधान यावेळी गिलने केले. शुबमन गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या जोरात प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. आता इंग्लंडमधील त्याच्या पहिल्यावहिल्या आंतराष्ट्रीय सामन्यात तो चांगले प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा असेल.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळणारा शुबमन गिलने त्याच्या फ्रेंचाईजीला एक मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणाला, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना माझ्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण सामना आहे. माझा पहिला हेतू हा धावा करण्याचा असेल, दबावाखाली खेळण्याचा नाही. जेव्हा तुम्ही धावा काढायला बघतात, तेव्हा गोलंदाज एक पाऊल मागे सरकतो आणि दबाव आपसूकच गोलंदाजांवर येतो. बाद न होता खेळपट्टीवर टिकून राहिले तर तुम्हाला चांगल्या चेंडूंवर देखील धावा काढण्याची संधी मिळते.”
गिलने १९ वर्षाखालील आणि लिस्ट ए च्या सामन्यांमध्ये इंग्लंड दौरा केला आहे. जिथे त्याची सरासरी उत्तम होती. त्याचप्रमाणे साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या इंट्रा-स्क्वाड सामन्यामध्ये ८५ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला अंतिम अकराच्या संघात संधी मिळाली आहे. या संधीचे तो सोने करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा
सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली