विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 6 सामने खेळले आहेत. हे सहाच्या सहा सामने भारताने जिंकले आहेत. अशात भारत सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ऐतिहासिक वानखेडे मैदानावर गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या पुनरागमनाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणालाय रोहित, जाणून घेऊयात…
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यानुसार, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची सद्यस्थिती पाहता, आताच त्याच्या पुनरागमनाची तारीख सांगणे कठीण आहे. मात्र, त्याने अष्टपैलूच्या तब्येतीविषयी चांगली बातमी दिली आहे.
भारताचा 30 वर्षीय अष्टपैलू पंड्या 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीची पुष्टी झाली होती. बीसीसीआयने सुरुवातीला सांगितले होते की, पंड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकणार नाही, पण लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला उपलब्ध असेल. मात्र, असे घडले नाही. तो आता साखळी फेरीतील सामने खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवसाआधी बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) रोहितने याबाबत खुलासा केला. त्याने सांगितले की, संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या दुखापतीचे दररोज आकलन करत आहे आणि ज्याप्रकारची दुखापत आहे, ठीक होण्यात आणखी थोडा वेळ लागू शकतो.
रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या बाहेर झाल्याची पुष्टी करत म्हटले, “तो एनसीएमध्ये ज्या प्रक्रियेतून गेलाय, ते खूपच सकारात्मक आहे. मात्र, ही त्याप्रकारची दुखापत आहे, जिथे आम्हाला दरदिवशी पाहावे लागेल की, तो किती बरा झाला आहे आणि किती टक्के तंदुरुस्त आहे. आम्हाला सातत्याने नजर ठेवावी लागेल की, तो किती गोलंदाजी आणि फलंदाजी करत आहे. विश्वचषकात 3-4 दिवसात सामना होतो, त्यामुळे आम्हाला दरदिवशीच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल. ज्याप्रकारे तो बरा होत आहे, आशा आहे की, तो लवकरच मैदानावर दिसेल.”
भारतीय संघाने आतापर्यंत साखळी फेरीतील सहा सामने खेळले आहेत. तसेच, अजूनही 3 सामने बाकी आहेत. भारताने 6 सामने जिंकत उपांत्य फेरीतील जागा पक्की केली आहे. तसेच, चाहत्यांना आशा असेल की, हार्दिक जरी साखळी फेरीत खेळला नाही, तरीही तो उपांत्य फेरीती संघात पुनरागमन करेल, जेणेकरून भारताचे संयोजन आणखी चांगले होऊ शकेल. (skipper rohit sharma confirmed hardik pandya won t be available on thursday against sri lanka)
हेही वाचा-
श्रीलंकेविरुद्ध भिडण्यापूर्वी रोहितची गर्जना; म्हणाला, ‘कोणताही विचार न करता बॅट…’
पराभव एकाचा, नुकसान भलत्याचेच! न्यूझीलंड हारताच भारताचे Points Tableमध्ये मोठे नुकसान, बावुमासेनेची भरारी