श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शनिवारी (१६ जुलै) सुरुवात झाली. गॉल येथील या सामन्याच्या पहिल्या दिवसावर पाहुण्या पाकिस्तानने वर्चस्व गाजवले. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा पहिल्या दिवसाचा नायक ठरला. श्रीलंकेला २२२ धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानला पहिल्या डावात २४ धावांवर दोन धक्के बसले आहेत.
दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, आफ्रिदीने श्रीलंकेच्या डावाला सुरूंग लावला. त्याने चार बळी मिळवले. श्रीलंकेसाठी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश चंडीमलने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले. तर सलामीवीर ओशाडा फर्नांडो याने ३५ धावा केल्या. पाकिस्तानसाठी आफ्रिदीने चार तर, हसन अली व यासीर शहा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
पहिल्या दिवशी सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावलेल्या श्रीलंकेने गोलंदाजीत चांगली सुरुवात केली. कसून रजिथाने याला केवळ एका धावेवर माघारी पाठवले. तर जयसूर्याने दुसरा सलामीवीर शफिक याला तंबूचा रस्ता दाखवला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने २ बाद २४ धावा केल्या होत्या. अनुभवी अझहर अली तीन व कर्णधार बाबर आझम एक धाव करून नाबाद आहे. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची आणखी पडझड न होऊ देता, मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान या दोन्ही मातब्बर फलंदाजां समोर असेल.
श्रीलंका संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत सोडवली. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकल्यानंतर प्रवीण जयविक्रमा व पदार्पण करणाऱ्या प्रभात जयसूर्या यांच्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दुसरी कसोटी जिंकली. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची राहणार आहे. कारण, या मालिकेत विजय मिळवणाऱ्या संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आफ्रिदीने श्रीलंकन कर्णधाराच्या उडवल्या दांड्या, बाद झाल्यावर स्टम्पकडे पाहतच राहिला
मॅंचेस्टरमध्ये टीम इंडियाची वाट अवघड? शेवटच्या सामन्यासाठी संघात होणार बदल?
धोनीला एकटे फिरताना पाहून चाहत्यांनी केले ‘हे’ कृत्य, लंडनमधील व्हिडिओ होतोय व्हायरल