भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये एकमेव गुलाबी चेंडू कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. परंतु भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या या निर्णयाला चुकीचे ठरवले. तिने चिवट झुंज देत दणकेबाज शतक झळकावले आहे. यासह तिच्या खात्यात बऱ्याचशा अद्वितीय विक्रमांची नोंद झाली आहे.
या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत तिने पहिल्या दिवसाखेर नाबाद ८० धावा चोपल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याने तिचे शतक होता होता राहिले. परंतु दुसऱ्या दिवशीही तीच लय कायम राखत तिने वैयक्तिक १२७ धावा फलकावर लावल्या आहेत. २१६ चेंडूंचा सामना करताना १ खणखणीत षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने तिने ही प्रशंसनीय शतकी खेळी केली.
हे तिचे कसोटी स्वरुपातील ऑस्ट्रेलियाच्या भूमीतील पहिलेवहिले शतक होते. यापूर्वी तिने ऑस्ट्रेलियामध्येच शतकी खेळी केली होती. परंतु तिचे हे शतक कसोटी नव्हे तर ५० षटकांच्या वनडे स्वरुपात आले होते. यानंतर तिने पुन्हा ऑस्ट्रेलियात कसोटी शतक ठोकत भारतीय दिग्गजांच्या मांदियाळीत आपले नाव जोडले आहे. ती कसोटी आणि वनडे स्वरुपात ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारी केवळ पाचवी भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. तर महिलांमध्ये असा विक्रम करणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
स्म्रीतीसह या यादीत सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि विराट कोहली यांची नावे आहेत. या एकाहून एक सरस क्रिकेटपटूंनीही ऑस्ट्रेलियात वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये कमीत कमी १ शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
हेही विक्रम केले नावावर
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारी परदेशी महिला फलंदाज म्हणून स्म्रीतीने आपले नावे विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम आधी इंग्लडच्या मॉली हाईड यांच्या नावे होता. त्यांनी १९४९ साली सिडनी येथे १२४ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या स्थानी इंग्लच्याच मर्टल मॅक्लेगन आहेत. त्यांनी १९३५ साली सिडनी येथे ११९ धावांची खेळी केली होती. तर २०११ साली शार्लोट एडवर्ड्स हिने सिडनी येथे नाबाद ११४ धावांची खेळी केली होती.
याशिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारी स्म्रीती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आणखी विशेष बाब म्हणजे, ती पहिली महिला खेळाडू आहे, जिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूच्या सामन्यात शतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
घासून नाही ठासून येणार! आयपीएल २०२०मधील नामुष्कीनंतर धोनीच्या ‘त्या’ संदेशामुळे सीएसकेचे ढासू कमबॅक
कर्णधार मॉर्गनचा फ्लॉप शो सुरूच, तब्बल ‘इतक्यांदा’ एकेरी धावा करत नकोशा विक्रमांत बनला अव्वल
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’