आज भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात कोणाला विचारले की तुमच्या आवडत्या महिला क्रिकेटपटूचे नाव काय, तर अनेकांची उत्तरं ही स्मृती मंधाना अशी येतील. महाराष्ट्रातील तर बऱ्याच जणांसाठी ‘सांगलीकर’ स्मृती आवडती क्रिकेटपटू आहे. स्मृती आज क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या किंवा क्रिकेट हेच करियर म्हणून पाहाणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान आहे. देशाचा अभिमान असणाऱ्या अनेक प्रतिष्ठीत महिलांमध्ये आज तिचाही समावेश आहे, अशा या स्मृती मंधानाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ.
भावाला पाहून झाला क्रिकेटचा श्रीगणेशा
मुंबईत जन्म झालेल्या स्मृतीच्या घरात क्रिकेट तसे नवीन नव्हते. तिचे वडील आणि मोठा भाऊ क्रिकेट खेळायचे. त्यांनी जिल्हास्तरीय क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे क्रिकेटचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले. साधारण ४ वर्षांची असताना ती हट्टाने भाऊ श्रवणबरोबर सरावासाठी जात असे. सुरुवातीला ती मुंबईत आणि नंतर सांगलीमध्ये नेटच्या बाहेर उभी राहून त्याला फलंदाजी करताना बघत असत. त्याला पाहूनच स्मृती डाव्या हातात बॅट धरायला शिकली. खरंतर ती डावखरी नाही, मात्र भाऊ डाव्या हाताने फलंदाजी करत असल्याने तिलाही डाव्या हातातच बॅट धरण्याची सवय लागली. हळुहळू ती देखील फलंदाजीचा सराव करायला लागली.
लहान वयातच दिसली प्रतिभा
स्मृती क्रिकेट लहानपणापासूनच मनापासून खेळत होती. तिने बघता बघता वयाच्या ९ व्या वर्षीच १५ वर्षांखालील महाराष्ट्र संघात स्थान मिळवले होते. एवढेच नाही तर पुढे २ वर्षांत म्हणजेच वयाच्या ११ व्या वर्षी तिची निवड महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला संघात झाली.
स्मृतीच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रशिक्षक आनंद तांबवेकर यांचे मोठे योगदान राहिले. पुणे, मुंबई सारख्या शहरात क्रिकेटसाठी पोषक वातावरण असताना तिने सांगली सारख्या छोट्या शहरात क्रिकेटचे धडे गिरवले. तिच्या कारकिर्दीत सर्वात मोठा वाटा राहिला तो तिच्या कुटूंबाचा. तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी तिला क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी पूर्ण पाठिंबाही दिला.
द्विशतकासह आली प्रकाशझोतात
स्मृती सर्वात आधी प्रकाशझोतात आली ते तिने एकदिवसीय सामन्यात ठोकलेल्या द्विशतकामुळे. तिने २०१३ साली १९ वर्षांखालील पश्चिम विभागीय स्पर्धेत गुजरात विरुद्ध बडोदा येथे महाराष्ट्र संघाकडून १५० चेंडूत तब्बल २२४ धावा फटकावल्या होत्या. त्यावेळी ती एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती. त्यावेळी तिच्यातील ‘आक्रमक स्मृती मंधाना’ची ओळख सर्वांना पटली. विशेष म्हणजे हे द्विशतक तिने राहुल द्रविडच्या बॅटने ठोकले होते. द्रविडने तिच्या नावाने तिच्या भावाला बॅटवर स्वाक्षरी करुन भेट दिली होती.
भारताच्या संघात पदार्पण…
साल २०१३ हे वर्ष स्मृतीसाठी आणखी खास ठरले. तिने याच वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्याने स्मृतीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अहमदाबादमध्ये तिने एप्रिल २०१३ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. त्यानंतर तिने मागे वळूनही पाहिले नाही. त्याचवर्षी तिने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. पुढे २०१४ साली तिला इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळली.
स्मृतीसाठी २०१४ साली केलेला इंग्लंड दौरा सर्वात खास ठरला. तिने त्या दौऱ्यात ७४ धावांची खेळी केली. तो दौरा तिच्या कारकिर्दीला वळण देणाराही ठरला. त्यानंतर ती भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनून गेली.
साल २०१६ ने स्मृतीला स्टार केले…
स्मृतीसाठी २०१६ हे वर्ष अफलातून ठरले. त्याचवर्षी तिने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. एवढेच नाही तर त्या वर्षात तिला तिच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून आयसीसीच्या २०१६सालच्या सर्वोत्तम संघात स्थान मिळाले.
त्याचवर्षी स्मृतीला ऑस्ट्रेलियात होत असलेल्या महिला बीग बॅश लीगमध्ये खेळण्याची संधी चालून आली. तिने ब्रिस्बेन हिट संघासाठी १ वर्षाचा करार केला. ती परदेशी लीगमध्ये खेळणारी हरमनप्रीत कौरनंतरची केवळ दुसरीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. पुढे तिने २०१८ साली तिने इंग्लंडमधील किया सुपर लीग स्पर्धेसाठीही वेस्टर्न स्ट्रोम संघाबरोबर करार केला. ही लीग खेळणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली.
दुखापत आणि २०१७ सालचा विश्वचषक
महिला विश्वचषक २०१७ साठी काही महिनेच शिल्लक असताना स्मृती जानेवारीमध्ये बीबीएल स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना जखमी झाली. तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. २०१७ सालचा विश्वचषक जवळ आला असताना तिची दुखापत हा भारतासाठी फार मोठा धक्का होता. पण तिने जिद्द सोडली नाही. ती या काळात जवळपास रोज स्वत:ला विश्वचषकात खेळायचे आहे, असं बजावायची. तिने विश्वचषक खेळण्यासाठी दुखापतीवर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली.
यादरम्यान विश्वचषकाआधी झालेल्या महत्त्वाच्या सामन्यांतही तिला खेळता आले नव्हते. तिचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले ते थेट विश्वचषकात यजमान इंग्लंड संघाविरुद्ध. पण तिनेही जणू हा विश्वचषक गाजवायचा असंच मनाशी पक्कं ठरवलं होते. तिने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ९० धावा फटकावल्या. पुढच्या सामन्यात तिने शतकी खेळी करत स्पर्धेची सुरुवात भारताला जोरदार करुन दिली. त्यानंतर तिची बॅट फारशी बोलली नसली, तरी तिने दिलेल्या सुरुवातीने भारतीय महिला संघाच्या पंखात आत्मविश्वास भरला. त्यामुळे भारताने बलाढ्य संघांना नमवत थेट अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. पण अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला. मात्र, हा विश्वचषक म्हणजे भारतात महिला क्रिकेटमध्ये घडलेली एक क्रांती ठरला आणि यात स्मृतीचे मोठे योगदान होते. अनेकांना मिताली राज आणि झुलन गोस्वामी व्यतिरिक्त महिला क्रिकेटपटू माहित झाल्या. महिला क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल या विश्वचषकाने घडवून आणला. एवढेच नाही तर स्मृतीला ‘सुपरस्टार’ करणारा हा विश्वचषक ठरला.
पुढेही स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. अनेक विक्रम तिने आपल्या नावावर नोंदवले. आज ती भारतीय महिला वनडे आणि टी२० संघाची उपकर्णधार आहे.
जुन्या-नव्या पिढीला जोडणारी स्मृती
खरंतर स्मृती तशी फारशी अवखळ नाही. तिला शांतपणे अरजीत सिंगची गाणी ऐकत रमायला आवडतं. ती जेव्हा भारतीय संघात आली, तेव्हा संघात बऱ्याच वरिष्ठ खेळाडू होत्या आणि आता संघात अनेक युवा खेळाडू आहेत. पण या दोन्ही पिढ्यांना स्मृतीने जोडून ठेवलं. ती वरिष्ठ खेळाडूंमध्ये जितकी सहज सामावून गेली तितकेच तिने आताच्या नव्या पिढीच्या युवा क्रिकेटपटूंना आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे तिची संघातील उपस्थिती कोणालाही कधीही खटकली नाही.
बिझीनेस वूमन स्मृती
कोणताही खेळाडू त्याचा खेळ हा विशिष्ट वयापर्यंत खेळू शकतो. त्यामुळे अनेकदा खेळाडूंना त्यांच्या खेळातील कारकिर्दीनंतर काय असा प्रश्न पडतो. पण स्मृतीने ही गोष्ट आधीच ओळखत सांगलीमध्ये क्रिकेट अकादमी सुरु केली, इतकेच नाही तर तिने रेस्टॉरंट क्षेत्रातही पाऊल टाकले. तिने सांगलीतच कॅफे सुरु केला आहे. आज स्मृती कुटूंबाचे प्रमुखे आर्थिक पाठबळ आहे आणि म्हणूनच एका सांगलीसारख्या शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारी स्मृती तिच्या लहान वयातही अनेकांसाठी आदर्श आहे.
मानाच्या पुरस्कारांचीही मानकरी
स्मृतीने केवळ क्रिकेट गाजवलेच नाही तर अनेक पुरस्कारही मिळवले. ती २०१८ आणि २०२१ साली आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली. तसेच २०१८ साली तिला अर्जून पुरस्कारानही गौरविण्यात आले.
काही महत्त्वाचे विक्रम –
-आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू (२४ चेंडूत विरुद्ध न्यूझीलंड)
-शिखर धवननंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारी दुसरीच भारतीय क्रिकेटपटू.
-एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू
स्मृतीची कारकिर्द
कसोटी
सामने – ४
धावा – ३२५
शतके – १
अर्धशतक – २
एकदिवसीय क्रिकेट
सामने – ७८
धावा – ३०८४
शतके – ५
अर्धशतके २५
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट
सामने – ११९
धावा – २८५४
अर्धशतके – २२
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा
धोनीच्या गॅरेजमध्ये आहेत एखाद्या शोरूमपेक्षा जास्त बाईक्स! समोर आला खास व्हिडिओ