fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

दादाने तोडला वादा! सौरव गांगुलीने दिलेले वचन पाळले नाही, क्रिकेटर झाले नाराज

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची मागील वर्षी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी स्थानिक क्रिकेटपटूच्या विकासावर जास्त भर देणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते अध्यक्ष झाल्यापासून स्थानिक क्रिकेटपटूंच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल घडून आला नाही. यासोबतच मागील वर्षी झालेल्या रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक स्पर्धेतील मॅच फी खेळाडूंना अद्याप मिळाली नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, खेळाडूंना मागील वर्षातील मॅच फी अद्याप मिळाली नाही. गतवर्षीचा मौसम मार्च महिन्यात समाप्त झाला. रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूला सामन्याच्या दिवशी प्रतिदिनी 35 हजार रुपये मिळतात. तर मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रति सामन्यात 17500 रुपये मिळतात. जर कोणता खेळाडू रणजी ट्रॉफीमधील पूर्ण हंगामात म्हणजेच नऊ सामने खेळला तर त्याला 13 लाख रुपये मिळतात. 

महाराष्ट्र, मुंबई, बंगाल, त्रिपुरा आणि अन्य संघातील खेळाडूंना मॅच फी अद्याप मिळाली नाही. स्थानिक क्रिकेटपटूंना बीसीसीआय ऑनलाइन ट्रायजंक्शनच्या माध्यमातून मॅच फी पाठवण्याची व्यवस्था करते. खेळाडूंना दोन टप्प्यात हे पैसे दिले जाते. पहिल्यांदा मॅच फी आणि दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या रेव्हेन्यू मधील हिस्सा मिळतो.

खेळाडूंना मॅच फीस न मिळालेले ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.  तसेच खेळाडूंना सकल राजस्व शेअर(जीआरएस)गेल्या तीन वर्षांपासून देण्यात आला नाही. बीसीसीआय, आयपीएल आणि तसेच स्थानिक सामन्याचे प्रक्षेपण करण्याचे अधिकार काही चॅनलला देते. त्यातून चॅनल काही रक्कम बोर्डाकडे देते. यातून मिळणारी रक्कम म्हणजेच जीआरएसचा एक भाग आहे.

कोरोना व्हायरसमुळे पुढील रणजी हंगामाची कधी सुरुवात होईल, याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. 

You might also like