माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी (२ जानेवारी) सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.
गांगुली जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला कोलकात्याच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची पहिली अँजियोप्लास्टी करण्यात आली. यावेळी त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता.
तसेच, गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असून एका रक्तवाहिनीत ९० टक्के ब्लॉकेज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रविवारी दुपारी त्याची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. यानंतर गांगुलीने रात्री जेवण केले. आता सोमवारी त्याची इकोकार्डिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, “गांगुलीच्या तब्येतीची स्थिती पाहून त्याच्यावर अजून एक अँजिओप्लास्टी करण्यात यावी का नाही?, हा निर्णय घेतला जाईल. मेडिकल बोर्ड त्याची बायपास सर्जरी करण्याच्या पर्यायाचा विचार करत नाहीये. पुढील उपचारांबाबत सोमवारी रुग्णालयाची तज्ञ समिती आणि गांगुलीच्या कुटुंबियांची एक बैठक होईल. या बैठकीत गांगुलीच्या उपचारांबाबत चर्चा केली जाईल. त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील.”
महत्त्वाच्या बातम्या-
अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती
सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…