मुंबई | बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली भारताचे यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते. काही दिवसांतच त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान काही खेळाडूंनी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस देखील केली आहे. 2000 साली भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये एक दबदबा निर्माण केला होता.
याच दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार असताना ड्रेसिंग रुममध्ये घडलेले किस्से सौरव गांगुली क्रिकेट फॅन्सबरोबर शेअर करत आहेत. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांनी एप्रिल फुलच्या दिवशी गांगुली यांची मस्करी करू लागले. त्यांची ही चेष्टा गांगुलीला लवकर न समजल्याने त्यांनी थेट कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास तयार झाले होते.
गांगुली म्हणाले की, एप्रिल फुलच्या दिवशी घडलेला तो किस्सा मला आजही आठवतो. त्यावेळी माझ्याकडून धावा होत नव्हत्या. संघ चांगले प्रदर्शन करत नसल्याची मी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये दिली होती. यामुळे सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग निराश असल्याचे मला सांगत होते. वास्तविक पाहता मी प्रसारमाध्यमांशी संघातल्या कामगिरीविषयी काहीच बोललो नव्हतो.
माझ्या बोलण्याने कुणाला वाईट वाटले असेल तर मी तात्काळ माझ्या कर्णधारपदाचा राजीनामा देतो असे बोलून खुर्चीवर जाऊन बसलो. त्यावेळी हरभजन सिंग आणि सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रूममधले इतर सहकारी माझ्याकडे पाहून हसू लागले.
त्यानंतर मला सर्वांनी सांगितले की, आम्ही तुझ्याशी एप्रिल फुल करत होतो. त्यानंतर मलाही हसू आवरले नाही. त्या मालिकेतील पुढच्या सामन्यात चांगल्या धावा केल्या आणि त्यांच्या या एप्रिलफूलमुळे मी पुन्हा फॉर्मात आलो.