भारतात वाढलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही जोरदार बसला. हा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा प्रवेश झाला. त्यामुळे काही खेळाडू आणि संघांचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. परिणामी २९ सामन्यांनंतर हा हंगाम बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने स्थगित केला. त्यामुळे आता उर्वरित हंगामाच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सध्या भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक बरेचसे व्यस्त आहे. त्यामुळे हा उर्वरित आयपीएल हंगाम खेळवायचा म्हटला तरी कधी आणि कुठे हा मोठा प्रश्न आहे. तरी सध्या टी२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा हंगाम होऊ शकतो अशी चर्चा आहे. पण तरी अजूनतरी याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
या उर्वरित हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की हा हंगाम पूर्ण झाला नाही तर २००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते.
गांगुलीेने द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ‘जर आपण आयपीएल पूर्ण करण्यास अपयशी ठरलो तर जवळपास २५०० कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो. हा केवळ सुरुवातीचा अंदाज आहे.’
तो म्हणाला, ‘खूप फेरबदल करावे लागले आहे. आयपीएल स्थगित होऊन एक दिवसच झाला आहे. आम्हाला अन्य क्रिकेट बोर्डांशीही चर्चा करावी लागेल आणि पाहावे लागेल की टी२० विश्वचषकापूर्वी विंडो उपलब्ध (आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामासाठी) होईल की नाही.’
त्याचबरोबर गांगुली म्हणाला, ‘मी असे म्हणणार नाही की आयपीएलची स्थगिती हे नुकसान आहे. हे विसरु नका की मागीलवर्षी विम्बल्डन आणि ऑलिंपिक झाले नव्हते. ही वेळ वेगळी आहे आणि आपल्याला ते समजून घेऊन पुढे जावे लागेल. आपण या परिस्थितीत जास्त काही करु शकत नाही. आपल्या हातात केवळ गोष्टी सुधारण्याची वाट पाहाणे इतकेच आहे.’
तसेच येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडे आहे. मात्र, सध्याची भारतातील परिस्थिती लक्षात घेता, ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे.
याबद्दल गांगुली म्हणाला, ‘टी२० विश्वचषकाबद्दल काय होतय ते पाहू. अजूनही काही वेळ बाकी आहे आणि आपल्याला माहित नाही की महिन्याने कशा गोष्टी बदलतील. यावर आत्ता काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण सध्या आपण काही गृहीत धरु नये.’
आयपीएल २०२१ हंगाम स्थगित झाल्यानंतर इंग्लंडमधील कौउंटी ग्रुपने तसेच श्रीलंका क्रिकेटने आयपीएलचा हा उर्वरित हंगाम आयोजित करण्याची इच्छा दर्शवली आहे. तसेच हा हंगाम पूर्ण करण्यासाठी युएई हा देखील एक पर्याय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
घरात राहा! मुंबई इंडियन्सचा हटके पद्धतीने सॅनिटायझर बॉटलच्या माध्यमातून खास संदेश
संघसहकारी असावा तर असा! केवळ जैयस्वाललाच नाही तर अनुज रावतलाही बटलरकडून मिळाली खास भेट, पाहा व्हिडिओ
भारताबाहेर होणार आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन? इंग्लंडनंतर आता ‘या’ देशानेही दिली ऑफर