वनडे विश्वचषकात शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 270 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केशव महाराज याने दबावाच्या परिस्थितीत चौकार मारून दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला. एक विकेट आणि 16 चेंडू राखून आफ्रिकी संघाने हा सामना नावावर केला. सामन्यात पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचे प्रदर्शन देखील कौतुकास्पद म्हणता येईल.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटची 10 षटके खूपच रोमांचक ठरली. चाहते ऍडन मार्करम (Aiden Markram) याच्याकडे मॅच विनरच्या भूमिकेत पाहत होते. मात्र, मार्करन 41व्या षटकात संघाची धावसंख्या 250 असताना बाद झाला. विजयासाठी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला 71 धावा हव्या होत्या आणि अजून तीन विकेट्स बाकी होत्या. पुढच्या 10 षटकांमध्ये प्रत्येक चेंडू चाहत्यांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. मार्करम दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 91 धावांची खेळी करू शकला. पण मॅच विनरची भूमिका केशव महाराज याने पार पाडली, असे म्हणता येईल. पाकिस्तानला विजयासाठी फक्त एक विकेट हवी असताना महाराजने चौकार मारून दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला. महाराजने या सामन्यात 21 चेंडू खेळले आणि विकेट न गमावता 7 धावा केल्या, ज्या विजयासाठी सर्वात महत्वाच्या होत्या. तबरेज शम्सी याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. शम्सीने आपल्या संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली होती.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी विजयासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र, सामन्याचा शेवट त्यांना हवा तसा झाला नाही. शाहीन शाह आफ्रिदी फॉर्मात असून त्याने 45 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी पहिल्या डावात पाकिस्तान संघाने 46.4 षटकांमध्ये 270 धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझम आणि सौद शकील या दोघांनी संघाच्या या धावसंख्येसाठी वैयक्तिक अर्धशतके केली. शादाब खान याच्या बॅटमधून 43 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. न्यूझीलंडसाठी तबरेझ शम्सी याने 10 षटकात 60 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्को यान्सेन याने 43 धावा खर्च करून तीन, तर जेराल्ड कोएत्झी याने 42 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. (SOUTH AFRICA HAVE DEFEATED PAKISTAN BY JUST A WICKET)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हरिस रौफ
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
जोरदार कमबॅक करणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार न्यूझीलंड, विजयासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार दोन्ही संघ
चेपॉकवर पाकिस्तान सर्वबाद, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांची आवश्यकता