फुटबॉल विश्वचषकानंतर जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा असलेल्या युरो कपचा थरार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे. शुक्रवारपासून (२ जुलै ) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून, स्पेन व स्वित्झर्लंड पहिल्या सामन्यात समोरासमोर येतील. रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९:३० वाजता सुरू होईल. (Spain and Switzerland Face Off in euro 2020 first quarter final)
स्पेन व स्वित्झर्लंडची स्पर्धेतील वाटचाल
तीन वेळा युरो कप जिंकणारा स्पेनचा संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. सर्व वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर युवा खेळाडू प्रथमच कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळत आहेत. स्पेनने ई गटातून १ विजय व २ ड्रॉसह दुसरे स्थान मिळवत अंतिम १६ संघांमध्ये प्रवेश केला होता.
अंतिम सोळाच्या सामन्यात स्पेनने एक्स्ट्रा टाईमपर्यंत गेलेला सामन्यात क्रोएशियावर ५-३ असा विजय मिळवला.
दुसरीकडे, स्वित्झर्लंड संघ एक विजय, एक पराभव व एक ड्रॉ अशी कामगिरी करत ए गटात तिसर्या स्थानी राहूनही सरस गोलफरकाच्या बळावर अंतिम १६ फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम १६ फेरीत संभाव्य विजेता म्हणून पहिली पसंती दिल्या गेलेल्या फ्रान्सचा पराभव करून त्यांनी खळबळजनक निकालाची नोंद केली. ते प्रथमच युरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील.
या खेळाडूंवर असेल नजर
या सामन्यात दोन्ही संघाकडून काही प्रसिद्ध खेळाडू आपला खेळ दाखवतील. स्पेनसाठी कर्णधार सर्जिओ बॉस्केट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मध्यरक्षक कोके आणि सराबिया यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. फेरान टॉरेस व अल्वारो मोराटा यांच्यावर गोल करण्याची जबाबदारी आहे.
अंतिम १६ च्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या विजयाचा नायक ठरलेल्या गोलरक्षक सॉमरवर सर्वांची नजर असेल. अनुभवी शाका व कर्णधार शकीरी यांच्यावर संघाची मदार असेल. स्पेनला पराभूत करून स्वित्झर्लंडला इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया