इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. अतिशय चुरसीच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानने अखेर बाजी मारली. २ चेंडू राखून ३ विकेट्सने सामना जिंकत त्यांनी हंगामातील पहिला विजय साजरा केला. या सामन्यातून एका नव्या शिलेदाराने आयपीएलमध्ये पदार्पण केले.
गतवर्षीच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत काही परिचित नसलेले देशांतर्गत क्रिकेटमधील क्रिकेटरसुद्धा दिल्लीच्या ताफ्यात सहभागी झाले होते. त्यात या शिलेदाराच्या नावाचाही समावेश होता. परंतु संघात निवड होऊनही पूर्ण हंगाम त्याला बाकावर बसून राहावे लागले. परंतु ‘देर आये दुरुस्त आये’, म्हणतात ना अगदी तसचं. एका हंगामाच्या प्रतिक्षेनंतर अखेर राजस्थानविरुद्ध त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीचा श्रीगणेशा केला आणि पदार्पणाच्या सामन्यातच छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. दिल्लीचा हा पदार्पणवीर म्हणजे, २४ वर्षीय अष्टपैलू ललित यादव.
राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची वरची फळी सपशेल फेल ठरली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार पंत एका बाजूने डाव सावरण्याच्या प्रयत्नात होता. परंतु दुसऱ्या बाजूने पटापट विकेट्स जात असल्याने त्याचीही फलंदाजी अधिक रक्षात्मक होऊ लागली होती. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पदार्पणवीर ललितने त्याला पुरेपुर साथ दिली.
पंत आणि ललित यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी झाली. १२.४ षटकात कर्णधार पंत एक धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. अखेर ललितने पंधराव्या षटकापर्यंत कसाबसा दिल्लीचा डाव १०० धावांपर्यंत आणला. याच षटकात ख्रिस मॉरिसच्या चेंडूवर राहुल तेवतियाच्या हाती झेल देत तो पव्हेलियनला परतला. अशाप्रकारे पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात ३ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत २० धावांची त्याच्या खात्यात नोंद झाली.
याच पदार्पणवीर ललित यादवच्या आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासातील काही रोमांचक बाबींवर नजर टाकूया..
विरेंद्र सेहवाग ज्या नजफगडमधून येतो ललित त्याच नजफगडचा छोकरा. लहानपणापासून सेहवागचाच खेळ त्याला आवडत. सेहवागला आदर्श मानणारा ललित सांगतो,
“जेव्हा मी खेळायला सुरूवात केली, तेव्हा वीरू भैयाची फलंदाजी पाहत असत तसेच प्रदीप सांगवानही आमच्यासोबत सराव करत. मी या दोघांना अगदी जवळून पाहिले असल्याने, आपणही यांच्याप्रमाणे खेळू शकतो असा विश्वास वाटू लागला. एक क्रिकेटपटू म्हणून नेहमी वीरू भैय्या माझा आदर्श राहतील.”
ललितने २००७ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला आवड म्हणून क्रिकेट खेळत असलेल्या ललितला क्रिकेटचे व्यसन जडले. दिल्लीच्या क्रिकेट वर्तुळात ललितचे नाव पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आले जेव्हा चौदा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत ४० षटकांच्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले. तेथून पुढे वयोगट स्पर्धात तब्बल सात द्विशतके ठोकली. आयुष्याच्या एका वळणावर वयाच्या सतराव्यावर्षी क्रिकेट की करिअर हा प्रश्न पडल्यावर त्याने क्रिकेटला झुकते माप दिले.
धोनीला आदर्श मानणार्या ललितने, आपल्या आक्रमक खेळीचा नमुना २०१८ मध्ये डीडीसीएच्या २०-२० स्पर्धेत दाखवला. फिरोजशहा कोटला मैदानावर स्पोर्टिंग क्लबकडून खेळताना मद्रास क्लब विरुद्ध त्याने १५ चौकार व १२ षटकारांच्या सहाय्याने नाबाद १५० धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान ललितने एकाच षटकात सहा षटकार लगावण्याचा पराक्रम देखील केला होता. भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा सदस्य राहिलेल्या हिमांशू राणासोबत ललितने २२३ धावांची विक्रमी भागीदारी रचली.
२०१७ मध्ये प्रथमश्रेणी पदार्पण करणारा ललित सर्वांच्या नजरेत तेव्हा आला, जेव्हा २०१८ च्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने इरफान पठानच्या एकाच षटकात २४ धावा फटकावल्या. दिल्लीला अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी ३६ धावांची गरज असताना, त्याने इरफान पठानच्या १९ व्या षटकात तीन षटकार व एक चौकार मारत बडोद्याच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेतला होता.
अष्टपैलू असलेल्या ललितने आतापर्यंत ३६ देशांतर्गत टी२० सामन्यात १४५ च्या स्ट्राइक रेटने ५८० धावा व २७ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सेलिब्रेशन तो बनता है! पंतला धावबाद करताच रियान परागचा भर मैदानात बिहू डान्स, व्हिडिओ व्हायरल
अरेरे! विस्फोटक फलंदाज भरलेल्या दिल्ली कॅपिटल्सवर आली ‘ही’ नामुष्की, वानखेडे स्टेडियमवर…
रियान परागला मोलाचा सल्ला देताना विराट म्हणाला होता, ‘तू कधीही ऑरेंज कॅप जिंकू शकणार नाही, कारण…’