मुंबई । माजी भारतीय खेळाडू सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्ज सोडून युएईहून भारतात परतला आहे. तो आयपीएलचा 13 वा हंगाम खेळणार नाही. त्यांच्या अचानक भारतात परत येण्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा होत आहे. सीएसकेनेही ट्वीट करून म्हटले होते की, ‘हा संघ त्याच्या कुटूंबासमवेत आहे.’ त्यांच्या या ट्विटमधून कुटुंबात काहीतरी अप्रिय घडल्याचा अंदाज वर्तविला जात होता.
भारतात परतल्यानंतर सुरेश रैनाने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मुलांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. त्याचवेळी सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांचे म्हणणे आहे की, हॉटेलच्या खोली आवडली नाही त्यामुळे रैनाने आयपीएल सोडले. काही माध्यमांच्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर रैना अस्वस्थ झाला आणि त्याने युएई सोडण्याचा निर्णय घेतला.
आता आणखी एक धक्कादायक बातमी सीएसकेसाठी आली आहे. रैनानंतर चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज हरभजन सिंगही आयपीएल सोडू शकतो. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, हरभजन सिंग बहुधा आयपीएलचा 13 वा हंगाम सोडण्याचा विचार करत आहे. मात्र, हरभजन अद्याप युएईला पोहोचलेला नाही.
कौटुंबिक कारणास्तव हरभजन सिंग चेन्नई सुपर किंग्जसमवेत युएईला जाऊ शकला नाही. 1 सप्टेंबर रोजी तो युएईला जाणार होता. रैना परत आल्याने हरभजन सिंग देखील जाणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. युएईला जाण्यापूर्वी, त्याला भारतात दोन कोविड चाचण्या कराव्या लागतील. तो अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्याला दुबईला जाता येईल. तसेच त्याने कोरोना टेस्ट केली आहे का नाही याची देखील माहिती मिळू शकली नाही.