हा आहे तो मुलगा, ज्याने अश्विनला शिकवला कॅरम बॉल

गोलंदाजीने विरोधी संघाच्या कोणत्याही खेळाडूला चिंतेत आणण्याची क्षमता भारताचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनमध्ये (R Ashwin) आहे. गोलंदाजी करताना अश्विन ऑफ स्पिन व्यतिरिक्त कॅरम बॉलचाही वापर करतो.

कॅरम बॉलचा वापर कसा करावा हे अश्विनने एका गल्ली क्रिकेटरकडून शिकले आहे. क्रिकबझ या वेबसाईटच्या चॅट शोमध्ये बोलताना अश्विन म्हणाला की, “जेव्हा मी पहिल्यांदा टेनिस चेंडूने क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा मी फलंदाजी करत होतो. तिथे एक मुलगा वेगळ्याच शैलीने गोलंदाजी करत होता.”

“त्याचा चेंडू हवेत आतमध्ये येत होता. तो चेंडूला सलग दोन्ही दिशेला फिरवत होता. आता मला माहिती नाही की तो कुठे आहे. मी त्याच्यासारखा गोलंदाज आतापर्यंत पाहिलेला नाही,” असे कॅरम बॉल शिकविणाऱ्या मुलाबद्दल बोलताना अश्विन म्हणाला.

https://twitter.com/cricbuzz/status/1229001183320137728

33 वर्षीय अश्विनने सांगितले की, त्या मुलाचे नाव एसके  होते. याच मुलाने मला कॅरम बॉल (Carrom Ball) कसा टाकायचा हे शिकविले. अश्विनने पुढे सांगितले की, तो टेनिस चेंडूने उत्कृष्ट खेळत होता. परंतु मुलगा गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी जातो हे त्याच्या वडिलांना आवडत नव्हते.

“टेनिस क्रिकेटमध्ये माझे मोठे नाव होते.  परंतु तेव्हा त्या गोलंदाजाने आपल्या कलेने मला आश्चर्यचकीत केले. मी रोज सकाळी त्या मुलाकडून कॅरम बॉल शिकण्यासाठी जात होतो. अवघ्या 10-15 दिवसांत त्याने मला कॅरम बॉल टाकायला शिकविले,” असेही अश्विनने सांगितले.

अश्विनने त्या मुलाबद्दल दिलेल्या माहितीनंतर क्रिकबझने या वेबसाईटने त्या मुलाचा शोध घेतला. त्या मुलाचे नाव कार्तिक शेखर (Kartik Shekhar) आहे. क्रिकबझने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये शेखर अश्विनसाठी मेसेज देत आहे.

“अश्विन, मी तोच एसके आहे ज्याला तुम्ही शोधत होता. तुम्ही माझी प्रशंसा केली. याचा मला खूप आनंद झाला. आम्हांला तुमचा अभिमान आहे. टेनिस चेंडू क्रिकेट ते भारताला सन्मान मिळवून देत तुम्ही लांबचा पल्ला गाठला. मी आश्चर्यचकीत झालो आहे की माझी कॅरम बॉलची शैली इतकी चांगली होती. परंतु मला ही शैली गंभीरतेने घ्यायला हवी होती,” असे एसके यावेळी म्हणाला.

दीर्घकाळापासून अश्विन वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट संघातून बाहेर आहे. अश्विनने आपला मागील वनडे सामना जून 2017 मध्ये विंडीजविरुद्ध खेळला होता. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 सामनादेखील त्याने 3 वर्षांपूर्वी विंडीज विरुद्ध खेळला होता.

तो सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. तसेच 21 फेब्रुवारीपासून यजमान न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. अश्विनने 70 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानेे 362 विकेट्स घेतल्या आहेत.

You might also like