fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘क्रीडाविश्‍वातून उलगडते संघटनात्मक उत्कृष्टता’, प्रसिध्द क्रीडा समालोचक व ज्येष्ठ पत्रकार अयाज मेनन यांचे प्रतिपादन

पुणे। वैयक्तिक व संघटनात्मक उत्कृष्टतता समजून घेण्यासाठी क्रीडाविश्‍व हे एक उत्तम उदाहरण आहे,असे प्रतिपादन प्रसिध्द क्रीडा समालोचक व ज्येष्ठ पत्रकार अयाज मेमन यांनी येथे व्यक्त केले. द इंडस आंत्रप्रेन्युअर्स तर्फे आयोजित टायकॉन 2019 या स्टार्टअप्ससाठी हॉटेल वेस्टीन येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी द इंडस आंत्रप्रेन्युअर्स पुणे चे अध्यक्ष किरण देशपांडे,टायकॉन 2019 चे आयोजन समितीचे अध्यक्ष विनित पटनी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अयाज मेमन म्हणाले की,खेळामुळे एकनिष्ठता,अचुकता,दृढ निश्‍चय,सांघिक प्रयत्न आणि खेळाडू वृत्ती याला चालना मिळते.खेळ हा आपल्याला सकारात्मक दृष्टीकोन शिकवितो आणि जेव्हा जेव्हा आपण खाली पडतो तेव्हा परत उठायला शिकवितो.थोडक्यात खेळाच्या वृत्तीमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपला दृढ निश्‍चय वाढविण्यात मदत होते.कुठल्याही खेळात जिंकणे हे सर्वांत महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आत्मविश्‍वास महत्त्वाचा असतो.या सर्व गुणांमुळे क्रीडाविश्‍वाद्वारे आपले व्यक्तिमत्त्व व चारित्र्य तयार करण्यास मदत होते.क्रीडाविश्‍वातून आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे फक्त प्रतिभा पुरेशी नसते तर परिश्रम,वचनबध्दता आणि योग्य निर्णयातून साध्य झालेली कामगिरी तेवढीच महत्त्वाची असते.प्रतिभा ही एक पहिली पायरी असते,परंतु नंतरच्या प्रवासाला अथक परिश्रम करावे लागतात.

सध्याच्या भारतातील क्रीडा क्षेत्राबाबत बोलताना अयाज मेमन म्हणाले की,भारतात आपण जरी या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात असलो तरी अनेक नवीन महत्त्वाच्या घडामोडी दिसत आहेत.सोशल मिडियाचा वापर,लक्षणीय वाढला असून यामुळे खेळ बघण्याची साधने बदलली आहेत.त्यामुळे डिजिटल राईटला देखील मोठे मूल्य प्राप्त होत आहे.मात्र खेळाची लोकप्रियता अजून वाढवायची असेल तर खेळामधील गुंतवणूकीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.तसेच खेळामध्ये महिलांचे प्रमाण वाढणे महत्त्वाचे आहे.करिअरच्या दृष्टीने प्रशिक्षणाबरोबरच स्पोर्टस सायन्स,स्पोर्टस थेरपीस्ट,स्पोर्ट न्युट्रीशन्स असे असंख्य नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत.ज्यामुळे भारतातील क्रीडा विश्‍वाला चालना मिळेल.

खेळाबद्दल आपली आवड व्यक्त करताना ते म्हणाले की,वानखेडेच्या प्रेसबॉक्समध्ये बसून मॅचेस पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.सचिन तेंडूलकरसारख्या जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना बघणे या अद्वितीय अनुभव आहे.हे महान खेळाडू आपला एक वारसा मागे सोडतात ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो व त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो.

You might also like