श्रीलंका विरुद्ध भारत संघात १८ जुलैपासून वनडे आणि टी२० सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. पण आता या वनडे आणि टी२० मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे या मालिकांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला होता.
श्रीलंका विरुद्ध भारत संघात १८ जुलैपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु होईल, तर २५ जुलैपासून टी२० मालिका खेळली जाईल. वनडे मालिकेतील सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. याआधी २.३० वाजता हे सामने सुरु होणार होते. पण आता अर्धातासाने सामन्यांची वेळ पुढे ढकलली आहे.
तसेच टी२० मालिकेतील सामने याआधी संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार होते. पण या सामन्यांची वेळही १ तासाने पुढे ढकलली असून आता भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता टी२० सामन्यांना सुरुवात होईल. सामन्यांच्या वेळेत बदल का करण्यात आले याबद्दलचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पण अशी चर्चा आहे की प्रसारकांच्या दबावामुळे हे बदल करण्यात आले आहेत.
भारतात वनडे आणि टी२० मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर होणार आहे. तसेच ५ विविध भाषेत सामने दाखवले जाणार आहेत.
असा आहे श्रीलंका दौरा
या श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहे. खरंतर या दौऱ्याला १३ जुलै रोजी सुरुवात होणार होती. मात्र, यजमान श्रीलंकेच्या गोटात कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळल्याने काही दिवस हा दौरा पुढे ढकलण्यात आला.
आता या दौऱ्याला बदललेल्या वेळात्रकानुसार १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २५, २७ आणि २९ जुलै रोजी खेळले जातील. वनडे आणि टी२० मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग.
असे आहे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील सामन्यांचे वेळापत्रक
वनडे मालिका –
१८ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
२० जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
२३ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
टी२० मालिका –
२५ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
२७ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
२९ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
महत्त्वाच्या बातम्या –
जवळचा भिडू असूनही ‘हा’ क्रिकेटर कुलदीपला म्हणाला, ‘…तर चापट खाशील’; व्हिडिओ व्हायरल
SLvIND: देवदत्त-ऋतुराजला पाहावी लागेल वाट, ८०० धावा चोपणारा ‘हा’ खेळाडूच करणार ओपनिंग!
SLvIND: सकारियाचे पदार्पण, पडीक्कल-गायकवाडच्या प्रतिक्षेत आणखी वाढ; ‘अशी’ असेल संभाव्य टीम धवन