भारताचा मर्यादीत षटकांच्या संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. १३ जुलैला वनडे सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होईल. मात्र, त्यापूर्वी श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
श्रीलंका संघ क्वारंटाईन
श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्याहून कोलंबो येथे पोहचल्यानंतर ४८ तासांनी फ्लॉवर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की फ्लॉवर यांना काही लक्षणे आढल्याने त्यांची गुरुवारी (८ जुलै) आरटी-पीसीआर टेस्ट केली. ज्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना यानंतर लगेचच वेगळे करण्यात आले असून आता ते क्वारंटाईन आहे. खरंतर इंग्लंडमधून परतल्यानंतर संपूर्ण श्रीलंका संघच सध्या कोलंबोमध्ये कडक क्वारंटाईनमध्ये आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार इंग्लंडमधून परतल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच खेळाडूंची कोरोना टेस्ट झाली आहे.
इंग्लंड संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात नुकतीच मर्यादीत षटकांच्या मालिका पार पडल्या. या मालिका ४ जुलै रोजी संपल्यानंतर ६ जुलै रोजी इंग्लंडच्या संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात ३ खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघच क्वारंटाईन झाला आहे.
तसेच याच कारणामुळे ८ जुलैपासून पाकिस्तानविरुद्ध सुरु झालेल्या वनडे मालिकेआधी इंग्लंडला एका रात्रीत संपूर्ण संघ नव्याने तयार करावा लागला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नव्या संघाची घोषणा करताना अष्टपैलू बेन स्टोक्सकडे नेतृत्वाची धूरा सोपवली. विशेष म्हणजे स्टोक्सच्या नेतृत्वाखाली या नव्या इंग्लंड संघाने पाकिस्तानला पहिल्या वनडेत ९ विकेट्सने पराभूतही केले.
मात्र, असे असले तरी आता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या मर्यादीत षटकांच्या मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. कारण इंग्लंडचे ७ सदस्यांनंतर २ दिवसातच फ्लॉवर देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच यापूर्वी टी२० मालिकेत सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावलेले फिल व्हिटीकेस कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले होते.
श्रीलंका-भारत वनडे मालिकेवर संकट
सध्यातरी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिका नियोजनाप्रमाणेच होईल असे सांगितले आहे. मात्र, जर येत्या काही दिवसात श्रीलंकेच्या अन्य सदस्यांपैकी अजून कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास वनडे मालिकेवर संकट येऊ शकते.
असा होणार आहे भारताचा श्रीलंका दौरा
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात १३ ते २५ जुलै दरम्यान मर्यादीत षटकांच्या मालिका होतील. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीने धोनीसाठी शेअर केलेल्या व्हिडिओवर संगकाराने ‘ही’ प्रतिक्रिया देऊन जिंकले चाहत्यांचे मन
“रिषभ पंत असेल भारताचा पुढील कर्णधार”, पाहा कोणी केली ही भविष्यवाणी
आयसीसीने गांगुलीला दिल्या ‘डबल’ शुभेच्छा, शानदार खेळीचा व्हिडिओ केला पोस्ट