मुंबई। अनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी प्रकाशझोतात ऑस्ट्रेलिया लिजंड्सविरुद्ध होणाऱ्या लढतीत श्रीलंका लिजंड्सचे पारडे जड असेल. सचिन तेंडुलकर याच्या इंडिया लिजंड्स आणि ब्रायन लारा याच्या वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्यातील लढतोप्रमानेच ह्या लढतीची उत्सुकता आहे. प्रकाशझोतात हा सामना रंगेल.
श्रीलंका लिजंड्सचे नेतृत्व तिलकरत्ने दिल्शान करीत आहे. हा संघ जास्त बलाढ्य वाटत आहे. त्यांच्याकडे आक्रमक आणि दर्जेदार खेळाडूंचे संतुलन आहे. दिल्शान आक्रमक, तर मर्वान अटापट्टू दर्जेदार फलंदाजी करेल. याशिवाय रोमेश कालुवितरणा हा मोहरा त्यांच्याकडे आहे. आपल्या काळात टी20 क्रिकेट असले असते तर त्याचा आनंद लुटला असता असे कालुवितरणा याने अलिकडेच म्हटले होते.
ऑस्ट्रेलिया संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू फारसे नाहीत, पण त्यांच्याकडे काही प्रतिभाशाली खेळाडू आहेत. टी20 प्रकारात यशस्वी ठरलेला ब्रॅड हॉज असा मोहरा त्यांच्याकडे आहे.
गोलंदाजीत श्रीलंकेची मदार महान ऑफस्पीनर मुथय्या मुरलीधरन याच्यावर असेल. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1347 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेचा मातब्बर वेगवान गोलंदाज चमिडा वास, सीम गोलंदाजी करणारा अष्टपैलू फरवीझ महारूफ आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रंगणा हेराथ असे दर्जेदार गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.
गोलंदाजीत ऑस्ट्रेलिया तितका पिछाडीवर वाटत नाही. ब्रेट ली हा धोकादायक मोहरा नव्या चेंडूवर सुरवात करेल. ऑफस्पीनर जेसन क्रेझा, झेव्हीयर डोहर्टी आणि अष्टपैलू शेन ली असे पर्याय त्यांच्याकडे आहेत. हा सामना प्रकाशझोतात असल्यामुळे खेळपट्टी सीम गोलंदाजीला मदत करेल, पण एकूण वर्चस्व फलंदाजांचे राहील.
उभय संघ।
ऑस्ट्रेलिया लिजंड्स।
ब्रेट ली (कर्णधार), ब्रॅड हॅडीन, ब्रेट गीव्हज, जेसन क्रेझा, मार्क कॉसग्रोव्ह, नेथन रिअर्डन, शेन ली, ट्रॅव्हीस ब्रीट, बेन लॉलीन, ब्रॅड हॉज, क्लिंट मॅके, झेव्हीयर डोहर्टी.
श्रीलंका लिजंड्स।
तिलकरत्ने दिल्शान (कर्णधार), चमिंडा वास, फरवीझ महारूफ, मर्वान अटापट्टू, मुथय्या मुरलीधरन, रंगणा हेराथ, रोमेश कालुवितरणा, सचित्र सेनानायके, चमारा कपुगेदारा, थीलन तुषारा, उपुल चंदना, मलिंदा वर्णपुरा