fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

उद्यापासून सिन्नर-नाशिक येथे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डीचा थरार!

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यनेते नाशिक जिल्हा कबड्डी असो. जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच-सिन्नर यांच्या सहकार्याने दि.३१ऑक्टोबर ते ०४नोव्हेंबर २०१८या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करीत आहे.

यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी, पुणे विरुद्ध बीड, जालना वि हिंगोली, कोल्हापूर वि पालघर या पुरुषांतील, तर नाशिक वि परभणी, पालघर वि लातूर या महिलांतील सामन्याने ” ६६व्या वरिष्ठ गट पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डीचे रणशिंग फुंकले जाईल.

सिन्नर- नाशिक येथील आडवा फाटा मैदानावर या करिता ६ क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ४० ते ४५ खेळाडू सध्या प्रो-कबड्डीच्या स्पर्धेत खेळत असल्यामुळे या स्पर्धेत चुरस पहावयास मिळेल.

पुण्याचे सिद्धार्थ देसाई, विकास काळे, विराज लांडगे, अक्षय जाधव आदी खेळाडू या वेळी पुण्यात नसणार, त्यामुळे पुण्याचा या स्पर्धेत कस लागणार आहे. नितीन मदने सांगलीकरिता उपलब्ध असल्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा सांगलीकर कसा उठवितात आणि त्याचा खेळ कसा बहरतो यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे.

सांगली बरोबरच यंदा रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर यांना देखील या संधीचा फायदा उठविता येइल. रिशांक जरी नसला तरी निलेश शिंदेच्या उपलब्धतेमुळे उपनगरला कमी लेखून चालणार नाही.

नाशिकने देखील सागर बांदेकर या अनुभवी माजी खेळाडुकडे प्रशिक्षकपद देऊन या स्पर्धेत उडी घेतली आहे. परभणी, नंदुरबार देखील या स्पर्धेवर आपला ठसा उमठविण्यास उत्सुक आहेत. या स्पर्धेत नवोदितांना संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या खेळाचा कस लागणार आहे.

खेळ आणि खेळाडू यांना या स्पर्धेत केंद्रबिंदू मानण्यात आल्यामुळे या स्पर्धेकरिता अत्यंत उत्तम अशी शास्त्रोयुक्त पद्धतीने मातीची क्रीडांगणे तयार करण्यात येत आहेत. खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था देखील सर्वोत्तम करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

दहा हजार कबड्डी रसिक आरामात सामन्यांचा आनंद लुटू शकतील अशाप्रकारे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. भव्य व्यासपीठ, खेळाडूंच्या वार्मिंग अप करिता मोठी जागा, सामना पहाण्यासाठी भव्य स्किन देखील रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बुध. दि.३१ ऑक्टोबर रोजी सायं. ४-०० वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. प्रथम या स्पर्धेची सुरुवात सामने खेळवून करण्यात येईल. त्यानंतर सायं. ६-००वा. विधान परिषदेचे सभापती मा. श्री रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात येईल. उदघाटन आणि स्थानिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम साधारण एक ते दिडतास चालतील. त्यानंतर पुन्हा सामने खेळविले जातील.

दि.२१ ऑक्टोबरपासून या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली. आज ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक जिल्हा संघटनेचे व सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. संयोजक उदय सांगळे, नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मोहन गायकवाड, शरद कातकडे, प्रशांत भाबड, बाळू घुगे, किरण मोठे, विजुभाऊ गीते, अमोल भामरे, शिवराम सांगळे या स्पर्धेत कोणतीही कसर राहू नये म्हणून जातीने लक्ष ठेऊन कार्यकर्त्यांकडून कार्य करून घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

चौथ्या वनडेत भारताचा विंडीजवर २२४ धावांनी शानदार विजय

ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा

You might also like