राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा उद्यापासून

पुणे। महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १४ सप्टेंबर आणि रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी मुकुंदनगर येथील चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत राज्यभरातून २० जिल्ह्यांनी सहभाग घेतला असून ३५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमधून मध्यप्रदेश येथील इंदोर मध्ये होणा-या राष्ट्रीय मिनी फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशनचे सचिव तकदीर सय्यद यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी माजी क्रीडा संचालक जनक टेकाळे, नगरसेवक अविनाश बागवे, पुणे जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जाधव, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते ताहीर आसी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत १९ वर्षाखालील मुली आणि १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात स्पर्धा होणार आहेत. साखळी आणि बाद पद्धतीने सामने होतील. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, लातूर, औरंगाबाद इ. जिल्ह्यातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

You might also like

Leave A Reply