रावळपिंडी। ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून त्यांची यजमानांविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने एक मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १६२ षटकांत ४ बाद ४७६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाकडून स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) १९६ चेंडूत ८ चौकारांसह ७८ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याने आता १० वेगवेगळ्या देशांत कसोटी अर्धशतक करण्याचा कारनामा केला आहे.
याबरोबरच स्मिथचा हा कसोटी कारकिर्दीतील १४८ वा डाव होता आणि त्याने आत्तापर्यंत ६१ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या १५० डावांमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा कारनामा केला आहे. त्याने हा कारनामा करताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
सचिनने (Sachin Tendulkar) त्याच्या पहिल्या १५० कसोटी डावांमध्ये ६० वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. या यादीत सुनील गावसकर (५९) तिसऱ्या आणि जो रुट (५६) चौथ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे स्मिथला अजून १५० डाव पूर्ण करण्यासाठी आणखी दोन डाव खेळावे लागणार आहेत (Most 50+ scores in the first 150 Test innings).
कसोटीत पहिल्या १५० डावांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू
६१ वेळा – स्टिव्ह स्मिथ
६० वेळा – सचिन तेंडुलकर
५९ वेळा – सुनील गावसकर
५८ वेळा – जो रुट
पहिला कसोटी अनिर्णित होण्याच्या मार्गावर
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चौथ्या दिवसाखेर १३७ षटकात ७ बाद ४४९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क १२ आणि कर्णधार पॅट कमिन्स ४ धावांवर खेळत आहे. तसेच अद्याप ऑस्ट्रेलिया २७ धावांनी पिछाडीवर आहे.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ व्यतिरिक्त उस्मान ख्वाजाने ९७, मार्नस लॅब्युशेन ९० आणि डेव्हिड वॉर्नरने ६८ धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीनने ४८ धावांचे योगदान दिले आहे. पाकिस्तानकडून नौमान अलीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
त्यापूर्वी पाकिस्तानकडून इमाम-उल-हक आणि अझर अली यांनी पहिल्या डावात दीडशतकी खेळी केल्या. इमामने १५७ धावांची आणि अझर अलीने १८५ धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने पहिल्या डावात तब्बल ४७६ धावांचा डोंगर उभा केला होता.
आता या सामन्यातील मंगळवारी (८ मार्च) अखेरचा दिवस आहे. त्यातच अद्याप ऑस्ट्रेलिया संघ अजूनही पहिल्या डाव खेळत आहे. त्यामुळे आता हा सामना अनिर्णित निकालाकडे वळताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आख्खं जग करतंय जडेजाचं कौतुक; पण भारताच्या ‘या’ माजी दिग्गजाला वाटतंय दु:ख, पण का?