आयपीएलच्या पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा लिलाव होणार आहे, मात्र तो मेगा लिलाव असेल की नाही, याबाबत अद्याप बीसीसीआयकडून स्पष्टता नाही. दरम्यान, खेळाडूंनी लिलावात आपली नावं देण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथचं नाव देखील शामिल आहे. स्मिथनं आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या लिलावात नाव देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
स्टीव्ह स्मिथ 2021 मध्ये शेवटचा आयपीएलमध्ये खेळला होता. तेव्हापासून तो लिलावात भाग घेत आहे, मात्र कोणत्याही संघानं त्याला खरेदी करण्यात रस दाखवलेला नाही. स्मिथ गेल्या काही काळापासून टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. यामुळे त्यानं पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टीव्ह स्मिथनं नुकत्याच झालेल्या ‘मेजर लिग क्रिकेट’मध्ये (एमएलसी) चांगली कामगिरी केली होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. या स्पर्धेच्या फायनमध्येही त्यानं शानदार फलंदाजी केली होती.
स्टीव्ह स्मिथनं 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तो अनेक वर्षे राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. तो संघाचा कर्णधारही होता. मात्र, तो राजस्थानला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. यानंतर राजस्थान रॉयल्सनं त्याला सोडलं. राजस्थानमधून स्मिथ दिल्ली कॅपिटल्समध्ये शामिल झाला. मात्र तिथे तो त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. यानंतर दिल्लीनंही त्याला संघातून रिलिज केलं. तेव्हापासून त्याला खरेदीदार मिळालेला नाही.
राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना 12 कोटींहून अधिक रक्कम घेणारा स्टीव्ह स्मिथ जेव्हा दिल्ली संघात गेला, तेव्हा त्याला केवळ 2 कोटी 20 लाख रुपये मिळाले. प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याचं स्थान निश्चित नव्हतं. यानंतर स्मिथ जास्त काळ आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता स्मिथ पुन्हा लिलावात केव्हा येतो आणि त्याला साईन करण्यात कुठला संघ रस दाखवतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा –
भारताच्या माजी क्रिकेटपटूला मिळाली मोठी जबाबदारी, या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
17 वर्षांचा सचिन सर्वांना पुरून उरला! आजच्याच दिवशी ठोकलं होतं कारकिर्दीतील पहिलं शतक
अद्भूत! अप्रतिम!! अविश्वसनीय!!!, सीएसकेच्या खेळाडूनं घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल