क्रिकेट एक असा खेळ आहे ज्यामध्ये क्रिकेट संबंधित अनेक लहान-सहान गोष्टींना देखील मान आहे. त्यापैकीच एक म्हणजे समालोचन. रीची बेनो, डेव्हिड लॉईड, जेफ्री बॉयकॉट यासारख्या क्रिकेटचे दिग्गज राहिलेल्या खेळाडूंनी निवृत्तीनंतर समालोचन करत देखील अफाट लोकप्रियता मिळवली. भारताचे रवी शास्त्री, सुनील गावसकर, संजय मांजरेकर या समालोचकांना त्यांच्या आगळ्यावेगळ्या समालोचन शैलीसाठी ओळखले जाते. सध्या, रमीझ राजा, नासिर हुसेन, इयान बिशप, इयान स्मिथ हे सर्वात्तम समालोचक म्हणून मानले जातात. भारतात टेलिव्हिजन समालोचक म्हणून आकाश चोप्रा, दीप दासगुप्ता, वीरेंद्र सेहवाग या माजी खेळाडूंनी देखील चांगले नाव कमावले आहे.
या सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंव्यतिरीक्त एक असा समालोचक आहे जो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरी समालोचन क्षेत्रात आघाडीवर आहे. तो समालोचक म्हणजे अॅलन विल्किंस. २२ ऑगस्ट १९५३ रोजी इंग्लंडमधील कार्डिफ येथे जन्मलेले ॲलन विल्किंस आज ६९ वर्षांचे होत आहेत.
इतर इंग्लिश मुलांप्रमाणे विल्किंस यांना देखील क्रिकेटर होऊ वाटले. विल्किंस यांना क्रिकेटव्यतिरिक्त रग्बी देखील आवडत. मात्र, त्यांनी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य दिले. डावखुऱ्या हाताने वेगवान गोलंदाजी करत असलेल्या विल्किंस यांनी शालेय क्रिकेट गाजवले. त्यावेळी काउंटी क्लब ग्लॅमॉर्गनने त्यांना आपल्या संघात खेळण्याचा प्रस्ताव दिला. विल्किंस यांनी तो तात्काळ मान्य केला. त्यानंतर १९७२ ते १९७९ पर्यंत सलगपणे ग्लॅमॉर्गन संघासाठी खेळले.
मधल्या काळात, १९७७ च्या ‘जिलेट कप’ या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत ग्लॅमॉर्गन संघाला नेण्यात विल्किंस यांचा मोलाचा वाटा होता. ग्लॅमॉर्गन संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पर्यंत पोहोचला होता. उपांत्यपूर्व फेरीत सरे व उपांत्य फेरीत लिसेस्टरशायर संघांविरुद्ध त्यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविलेले. १९७७ चा काउंटी हंगाम त्यांच्यासाठी सर्वोत्तम राहिला होता. त्या हंगामात त्यांनी ४७ बळी आपल्या नावे केले होते.
१९७९ चा हंगाम संपल्यानंतर विल्किंस ग्लूसेस्टरशायर संघात सामील झाले. १९८० मध्ये त्यांनी ग्लूसेस्टरशायरसाठी पदार्पण केले आणि १९८१ मध्ये लँकशायरविरुद्ध ५७ धावात ८ बळी घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले. विल्किंस यांनी १९८२ मध्ये पुन्हा ग्लॅमॉर्गनसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, १९८३ मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांनी निवृत्ती जाहीर केली.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, विल्किंस यांनी द. आफ्रिकेमध्ये टेलिव्हिजन प्रसारण क्षेत्रात पदार्पण केले. १९८९ ला पुन्हा इंग्लंडला आल्यावर ते इंग्लंडमधील एक नावाजलेले टेलिव्हिजन संवाददाता बनले. क्रिकेट व्यतिरिक्त, टेनिस, रग्बी व गोल्फचे नावाजलेले समालोचक म्हणून विल्किंस यांच्याकडे पाहिले जाते. विल्किंस यांनी विम्बल्डन तसेच गोल्फ विश्वचषकात देखील समालोचन केले आहे.
फेब्रुवारी २००० पासून विल्किंस सिंगापूरमध्ये स्थायिक झाले आहेत. आयसीसीच्या अधिकृत समालोचक गटात ते १९९६ पासून कार्यरत आहेत. हर्षा भोगले यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नसतानाही, सर्वोत्कृष्ट क्रिकेट समालोचक होण्याचा सन्मान त्यांना मिळाला आहे.