fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

-प्रणाली कोद्रे

१९९० ला त्याचं इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरला कसोटी पदार्पण झालं. त्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडने विजयासाठी ४०८ धावांचे आव्हान दिले होते. त्यामुळे भारतीय संघ सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करत होता. पण भारताने पाचव्या दिवसापर्यंच ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारत सामना हरणार असंच वाटत होतं. मात्र त्यावेळी १७ वर्षांच्या सचिनने आणि मनोज प्रभाकरने डाव सावरायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांची भागीदारी रंगत असताना तेव्हाचा कर्णधार आणि थोडा अंधश्रद्धाळू असणाऱ्या अझरुद्दीनने पाहिले पदार्पण केलेला तो खेळाडू गॅलरीतून उभा राहून चूपचाप सामना पाहत आहे. त्यावेळी अझरुद्दीनने त्याला आदेश देऊन टाकला. जोपर्यंत सामना संपणार नाही, तो पर्यंत तू इथेच थांबायचं. बिचारा तो खरंच तिथून हलला नाही. तो खेळाडू होता अनिल कुंबळे. विशेष म्हणजे भारताने तो सामना अनिर्णित राखला आणि त्याच सामन्यात सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

अनिल कुंबळेचा जन्म १७ ऑक्टोबर १९७० ला बंगळुरु येथे झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण बंगलोरमध्येच पूर्ण केले. त्यावेळी तो घराबाहेर टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. तसेच त्याने यंग क्रिकेटटर्स क्लब येथे प्रवेश घेतला होता. १५ वर्षापर्यंत तो मध्यमगती गोलंदाजी करायचा. पण त्याचा मोठा भाऊ दिनेशने त्याला नवीन गोष्ट ट्राय करायची म्हणून लेग-स्पीन गोलंदाजी करायलाही सांगितली. त्यावेळी त्याला शिकवण्यासाठी कोणी नव्हते. पण तो त्याच्या उंचीमुळे आणि मजबूत खांद्यामुळे लेग-स्पीन करतानाही चेंडूला बाऊन्स करु शकत होता. त्याची कर्नाटकच्या १५ वर्षांखालील शालेय संघातही निवड झाली होती.

त्यानंतर त्याने १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या १९८९-९० च्या मोसमात त्याने रणजीमध्ये ५ सामने खेळताना २४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण हैद्राबाद विरुद्ध झाले होते. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र फलंदाजी करताना तो दोन्ही डावात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याला १९९० ला आशिया चषकात संधी मिळाली. त्याने श्रीलंका विरुद्धच्या वनडे सामन्यातून १५ एप्रिल १९९० ला वनडे पदार्पणाबरोबरच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी कुंबळेने ४ वनडे सामने खेळले होते आणि त्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने ऑगस्ट १९९० ला इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या. पण सुरुवात काहीशी खराब झाल्याने त्याला संघातून वगळण्यात आले.

मग त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास पुन्हा सुरुवात केली. त्याने इराणी ट्राॅफीत शेष भारताकडून खेळताना दिल्ली विरुद्ध खेळताना १३८ चेंडूत १३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याच्याकडे निवडकर्त्यांना दूर्लक्ष करणे शक्य झाले नाही. त्याने पुन्हा १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. याचदरम्यान कुंबळेने क्रिकेट खेळतो म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्याने त्याची मॅकेनिकल इंजिनियरींगची डिग्री राष्ट्रीय विद्यालय कॉलेजमधून पूर्ण केली.

त्याला भारतीय संघात असताना जंबो हे टोपननावही पडले. एकदा या टोपननावाबद्दल कुंबळेनेच खूलासा केला होता. त्याला हे नाव नवज्योत सिंग सिद्धूंमुळे पडले होते. एकदा इराणी ट्रॉफीचा सामना खेळताना शेष भारताकडून खेळणाऱ्या कुंबळेच्या चेंडूंना उसळी मिळायला लागली. तेव्हा मिडऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सिद्धूने ‘जंबो जेट’ असे म्हटले. नंतर त्या शब्दातून जेट हा शब्द गायब झाला आणि केवळ जंबो हा शब्द राहिला. त्यामुळे पुढेही कुंबळेला संघसहकारी जंबो या नावानेच ओळखू लागले.

कुंबळेने त्याचे पुनरागमन गाजवले. त्याने दक्षिण आफ्रिकेत कसोटीत १८ विकेट्स घेतल्या. त्याने पुढे केवळ १० कसोटीत ५० विकेट्स घेण्याचाही कारनामा केला. पुढे तो विक्रम आर अश्विनने ९ कसोटीत ५० विकेट्स घेत मोडला. कुंबळेमध्ये जिद्द होती. त्याने जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि २००० नंतर हरभजन सिंगला साथीला घेत अनेक विक्रमांना गवसणी घालायला सुरुवात केली.

कुंबळेने फेब्रुवारी १९९३ ला मायदेशात पहिली कसोटी मालिका खेळली. त्याने इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेत ३ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आणि तो भारताचा प्रमुख गोलंदाज बनू शकतो हे त्याने दाखवून दिले. त्याने त्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत गोलंदाजीची सुरुवातही केली आणि दुसऱ्या डावात ६४ धावांत ६ विकेट्स घेतल्या. एव्हाना त्याने वनडे संघातही नियमित सदस्य म्हणून स्थान पक्के केले होते.

त्याने १९९४ ला कारकिर्दीत पहिल्यांच कसोटी सामन्यात १० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. त्याने त्याच्या कारकिर्दीतील १४ वी कसोटी खेळताना श्रीलंकेविरुद्ध लखनऊ येथे १२८ धावा देत ११ विकेट्स घेतल्या होत्या. १९९५-९६ मध्ये त्याने नॉर्थम्पटनशायरकडून काऊंटी क्रिकेटही खेळले. त्या मोसमात त्याने २०.४० च्या सरासरीने १०५ विकेट्स घेतल्या.

पुढचे वर्ष कुंबळेसाठी खास ठरले.  १९९६ च्या विश्वचषकात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ७ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या. त्यावर्षी त्याने वनडेत ६१ विकेट्स घेतल्या. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ९० विकेट्स घेतल्या. आता कुंबळे भारतीय संघातील अनुभवी खेळाडू झाला होता. १९९८ ला त्याने वनडेत २०० विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यावेळी तो वनडेत २०० विकेट्स घेणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला होता.

Photo Courtesy: Twitter/ ICC

१९९९ चे वर्ष उजाडले आणि कुंबळेसाठी ते वर्ष सर्वात अविस्मरणीय ठरले. दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला होता. या सामन्यात शेवटच्या डावात ७ फेब्रुवारी १९९९ ला कुंबळेने पाकिस्तानच्या १० फलंदाजांना बाद करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यावेळी तो जीमी लेकरनंतरचा एका कसोटी डावात १० विकेट्स घेणारा दुसराच गोलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे या डावात कुंबळेने जेव्हा ९ विकेट्स घेतल्या होत्या, तेव्हा त्याला १० वी विकेटही मिळावी म्हणून श्रीनाथने वाईड चेंडू टाकले होते. तसेच त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या वकार युनुसने पाकिस्तानचा कर्णधार वासिम आक्रमला मी धावबाद होऊ का म्हणजे कुंबळेला १० विकेट्स मिळणार नाही असे विचारले होते. पण त्यावेळी आक्रमने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. अखेर आक्रमलाच बाद करत कुंबळेने एका डावात सर्व १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

कुंबळेमध्ये क्रिकेट खेळण्याची इतकी जिद्द होती की त्याने २००२ मध्ये जबाडा फ्रॅक्चर झालेला असतानाही वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करत ब्रायन लाराची विकेट घेतली होती. त्याने त्याच्या कामगिरीने कर्णधारांच्या मनात विश्वास निर्माण केला होता. याच विश्वासामुळे कुंबळेसाठी गांगुली २००३ च्या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला संघात घेण्यासाठी निवडसमीतीशी भांडला होता. एवढेच नाही तर त्याने त्याचे कर्णधारपदही पणाला लावले होते. कुंबळेनेही त्याच्यावरचा हा विश्वास सार्थ ठरवत त्या मालिकेत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

डिसेंबर २००४ मध्ये कुंबळेने कपिल देव यांचा सर्वाधिक ४३५ कसोटी विकेट्सचा विक्रम मोडला. त्यावेळी ही खूप मोठी गोष्ट होती. कुंबळे भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. तसेच आता त्याची जोडी हरभजनसिंग बरोबर पक्की झाली होती. या दोघांनी मिळून प्रतिस्पर्धी संघांना अनेकदा संघर्ष करायला लावले. पण २००६ मध्ये कुंबळेला खांद्याच्या दुखापतीचा फटका बसला. पण त्याने तरी त्या दुखापतीनंतर चांगले पुनरागमन केले. २००७ च्या विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडळावा लागला. या विश्वचषकानंतर कुंबळेनेही वनडे क्रिकेटमध्ये थांबायचे ठरवले. तो वनडेमधून निवृत्त झाला. पण त्याने कसोटीत खेळणे सुरु ठेवले.

त्यावर्षी त्याने भारत-इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावत भारताकडून कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक करणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरण्याचा कारनामा केला होता. यावेळी कुंबळे ३६ वर्षे आणि २९६ दिवसांचा होता. कुंबळे केवळ चांगला गोलंदाज होता असे नाही, त्याने फलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. त्याने एकदा श्रीनाथबरोबर बंगळुरुला केलेली ५१ धावांची भागीदारीने भारताला सामना जिंकून दिला होता. तसेच त्याने कसोटीमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतके केली आहे. त्याने कसोटीमध्ये १३२ सामन्यात २५०६ धावा केल्या आहेत. त्याला २००८ मध्ये दुसरे कसोटी शतक करण्याची संधी होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऍडलेडला झालेल्या कसोटी सामन्यात कुंबळे त्याच्या दुसऱ्या कसोटी शतकाच्या जवळ होता. मात्र चहापानाची विश्रांती झाल्यानंतर पहिल्या डावात ८६ धावांवर खेळणाऱ्या कुंबळेला सेहवागने आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सेहवागचे ऐकून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केलेला कुंबळे ८७ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे कुंबळे त्याचे दुसरे कसोटी शतक न होण्यासाठी सेहवागला जबाबदार धरतो. याबदद्ल त्याने एका मुलाखतीतही सांगितले आहे.

कुंबळेला मैदानात चिडून गोलंदाजी करायला आवडायची. तो चिडला की अधिक आक्रमक गोलंदाजी करायचा. याचा एक किस्सा एकदा द्रविडने सांगितला होता. एकदा पेशावरमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना असाताना कुंबळे नेहमीच शांत असणाऱ्या इंझमाम उल हकवरही चिडला होता. त्यावेळी इंझी द्रविडला येऊन चक्क म्हणाला होता, ‘राहुल भाई, हा अनिल माझ्यावर का चिडला आहे, मी काय केले आहे. आफ्रिदीचा राग तो माझ्यावर का काढत आहे?’ पण कुंबळे जितका मैदानात चिडायचा तितकाच तो मैदानाबाहेर शांत असायचा.

असाच एक किस्सा असा की भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता आणि पहिल्या कसोटीत एका अंपायरला कुंबळेने कितीही अपिल केले तरी त्याचा चेंडू न समजल्याने बाद देता येत नव्हते. अखेर कुंबळेने दुसऱ्या कसोटीआधी त्या अंपायरला नेट्समध्ये बोलावले. त्यावेळी कैफ फलंदाजीचा सराव  करत होता. तेव्हा कुंबळेने कैफला समजावले, हे बघ मी तूझ्या पॅडवर चेंडू टाकतो, तेवढे ते पॅडवर तू घे. त्यानंतर त्याने मग कैफला पॅडवर चेंडू टाकून अंपायरला फिरकी गोलंदाजी काय आहे, हे समजावले होते.

असो, २००७ ला कुंबळेला भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली. ही संधी त्याला ११८ कसोटी सामने खेळल्यानंतर मिळाली होती. २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हरभजन आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंडमधील मंकीगेट प्रकरण भलतचं रंगल होतं. तेव्हा नेहमीच कोणत्याही गोष्टीवर ठाम असणारा कुंबळे भारतीय संघाच्या पाठिशी कर्णधार म्हणून खंबीरपणे उभे राहिला होता. आयसीसीने हरभजनवर सायमंडशी असभ्य भाषेत बोलण्याबद्दल बंदी घातली. पण त्या सामन्यानंतर कुंबळेने भारतीय संघाचं समर्थन करताना पत्रकार परिषदेत सरळ सांगून टाकलं ‘केवळ एक संघच खिलाडूवृत्तीने खेळला एवढंच काय ते मी सांगू शकतो.’ त्याच्या या वाक्याने खळबळ उडवली होती. आयसीसीने हरभजनवर सायमंडशी असभ्य भाषेत बोलण्याबद्दल बंदी घातली. पण भारतीय खेळाडूंनी कुंबळेच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयसह असे असेल तर आम्ही मालिकेतून माघार घेऊ ही धमकी दिली. त्यामुळे ही बंदी नंतर आयसीसीने उठवली.

त्याच मालिकेतील पर्थला झालेल्या पुढच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्या सामन्यात कुंबळेने सायमंडला बाद करत ६०० कसोटी विकेट्सचा टप्पाही पार केला. अखेर २००८ ला कुंबळेने सतत होणाऱ्या खांद्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्याने २००८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दिल्ली कसोटीनंतर थांबण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही मालिका सौरव गांगुलीचीही अखेरची मालिका होती. गांगुलीने कुंबळेनंतर एक सामना खेळून निवृत्ती घेतली. त्यावेळी त्या मालिकेनंतर भारतीय संघाने मोठी पार्टी केली होती. कुंबळे सांगतो ती रात्र कधीच विसरु शकत नाही. आम्ही दोघेही निवृत्ती घेत होतो. त्यावेळी कुंबळेने पहिल्यांदा भारतीय संघाबरोबर दारुही पिली होती. कुंबळेने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये खेळणे सुरु ठेवले होते.

आयपीएलमधील एक गमतीचा किस्सा म्हणजे २००९ मध्ये आरसीबीचा कर्णधार कुंबळे होता. त्याच्या समोर फलंदाजी करण्याची डेक्कन चार्जर्सकडून खेळणाऱ्या ऍडम गिलख्रिस्टला थोडी भीती वाटायची. एकदा या दोन्ही संघातील सामना असताना कुंंबळेने ठरवले होते, जेव्हा गिलख्रिस्ट स्ट्राईक घेईल तेव्हा गोलंदाजी करायची आणि गिलख्रिस्टही कुंबळे दुसऱ्या गोलंदाजाला चेंडू देईपर्यंत वाट पहात होता, अखेर कुंबळेने स्टेनकडे चेंडू सोपवला आणि गिलख्रिस्टने स्ट्राईक घेतली. त्याच मोसमात पुढे बाद फेरीतही या दोन संघात सामना झाला. त्यावेळी गिलख्रिस्टने होईल ते होईल असा पवित्रा घेतला आणि फलंदाजीला आला, तेव्हा त्याने कुंबळेने टाकलेल्या फुलटॉसवर विकेट बहालही करुन टाकली होती.

कुंबळेने आयपीएलमध्ये खेळणे थांबवल्यावर क्रिकेट प्रशासनात प्रवेश केला. त्याने बीसीसीआय, आयसीसीमध्ये टेक्निकल ऍडवायझर म्हणूनही काम पाहिले. तसेच तो प्रशिक्षण क्षेत्रातही उतरला. त्याने २०१६ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक पदाची जबाबदारी हाती घेतली. पण वर्षभरातच त्याच्यातील आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीमध्ये झालेल्या वादामुळे जून २०१७ मध्ये प्रशिक्षणपदाचा राजीनामा दिला. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मोठे विजयही मिळवले होते.

कुंबळे हा मैदानात कितीही आक्रमक असला तरी तो एका संन्यासासारखा होता. तो १८ वर्षे खेळत असताना अनेक गोलंदाज आले. काही भाव खाऊनही गेले. पण त्याने कधी त्याचे लक्ष विचलित होऊ दिले नाही. तो एकाच ध्यासाने १८ वर्षे गोलंदाजी करत राहिला. त्याचमुळे तो आज भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या याच ध्यासामुळे त्याला कसोटीत ६१९ विकेट्स तर वनडेत ३३७ विकेट्स अशा मिळून तब्बल ९५६ विकेट्स घेता आल्या आणि नावाप्रमाणे तो खरंच भारताचा जंबो गोलंदाज असल्याचेही त्याने दाखवून दिले.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like