---Advertisement---

तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या रक्ताचे भुकेले होते इंग्लिश बॉलर्स, डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी आखलेला डाव

Gubby-Allen-And-Harold-Larwood
---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विवादास्पद घटना कोणती? हा प्रश्न विचारल्यानंतर अनेकांचे उत्तर येते मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग. क्रिकेटला या प्रकारांमुळे काळीमा फासली गेल्याचे म्हटले जाते. मात्र, जुन्याजाणत्या क्रिकेटप्रेमींना हा प्रश्न विचारला, तर त्यांचे उत्तर मात्र वेगळे येते. त्यांच्यामते क्रिकेटवरील सर्वात मोठा डाग म्हणजे बॉडीलाईन सीरिज. काय होती ही बॉडीलाईन सीरिज आणि त्यामुळे कशाप्रकारे क्रिकेट बदनाम झाले, हे विस्तृतपणे सांगणारा आजचा हा लेख.

ऍशेस म्हणजे क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी रायवलरी. पहिली अधिकृत मॅच ज्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली त्याच दोन देशातील टेस्ट सीरिजला ऍशेस म्हटले जाते. या ऍशेसला मोठी परंपरा आहे. मात्र, या ऍशेसच्या इतिहासात एक सीरिज अशी खेळली गेली, ज्यात इंग्लिश बॉलर्स ऑस्ट्रेलियन बॅटर्सच्या रक्ताचे प्यासे झालेले. साल होतं 1933. इंग्लंड ऑस्ट्रेलियात खेळणार होती, आणि इथेच झाला तो खूनी खेळ.

बॉडी लाईन सीरिज कशी झाली? तिथे नक्की काय घडलं? हे जाणून घेण्याआधी हे नक्की का घडलं? हे माहिती करून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याआधीची 1930 ची ऍशेस झालेली इंग्लंडमध्ये. डॉन ब्रॅडमन यांनी 974 रन्स करत एकट्याच्या जीवावर यजमान इंग्लंडला पाणी पाजलेले.‌ 2-1 ने ऍशेस ऑस्ट्रेलियात नेलेली. आपल्याच घरात येऊन आपल्याला मात दिली याचा प्रचंड राग इंग्लिश कॅप्टन डग्लज जार्डीन‌ यांच्या मनात धुमसत होता. आता काहीही करून पुढच्या वेळी ऍशेस माघारी आणायचीच, हा निर्धार त्यांनी केलेला. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद हवं ते सर्व वापरायचे त्यांनी ठरवलं.

आता ज्याप्रकारे खेळाडू विमानाने प्रवास करतात अगदी तसं त्यावेळी नव्हतं, तेव्हा जहाजातून समुद्र मार्गे प्रवास करावा लागायचा. यामध्ये महिनाभरापेक्षा जास्त कालावधी जायचा. जार्डीन यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त ऍशेसची कुपी घुमत होती. या प्रवासादरम्यानच त्यांनी एक निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपले दोन्ही प्रमुख फास्ट बॉलर्स हेरॉल्ड लारवूड आणि गुबी ऍलेन यांना बोलावून घेतले. त्यांना अत्यंत थंड डोक्याने सांगितले की, आपल्याला येणाऱ्या ऍशेसमध्ये बॉडी लाईन बॉलिंग करायची आहे.‌ म्हणजे फक्त छाती आणि डोक्यापर्यंत जातील असे बाऊंसर. त्यासाठी फिल्डिंगही तशीच लावली जाईल. काही करून ऍशेस इंग्लंडमध्ये यायला पाहिजे. लारवूड तयार झाले, पण ऍलेन यांनी सुरुवातीला नकार दिला. शेवटी हो नाही करत ते देखील तयार झाले.

सिडनीत पहिली टेस्ट झाली. ऑस्ट्रेलियासाठी ब्रॅडमन खेळत नव्हते. इथेच पहिल्यांदा जार्डिन यांनी लारवूड आणि ऍलेन यांना धावा बोलायला सांगितला. केवळ तिघांपुरताच मर्यादित असलेला हा प्लॅन त्यांनी प्रत्यक्ष मैदानात अंमलात आणला. त्यांची इतर टीमही यापासून अनभिन्न होती. याच मॅचमध्ये इफ्तिखार पतौडी पहिल्यांदा इंग्लंडसाठी खेळले. त्यांनी शतकही ठोकले. इंग्लंड आरामात जिंकली. मात्र, पतौडी यांनी बगावत केली. आपण जेंटलमन्स गेमवर डाग लागेल, अशा कोणत्याही कृतीत सहभागी नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. परिणामी, दुसऱ्या टेस्टमधून त्यांना बाहेर केले गेले.

मेलबर्न येथील दुसऱ्या टेस्टमध्ये ब्रॅडमन यांचे आगमन झाले. खरंतर ज्या ब्रॅडमनसाठी हा सगळा खटाटोप जार्डिन आणि लारवूड यांनी केला होता, त्या ब्रॅडमन यांना पहिल्याच बॉलवर बो यांनी आऊट केले. बाऊंसरची अपेक्षा असताना लेन्थ बॉलवर ब्रॅडमन क्लीन बोल्ड झाले. दुसऱ्या इनिंगमध्ये ब्रॅडमन यांनी शतक ठोकलं आणि ऑस्ट्रेलिया जिंकली. सीरिज बरोबरीत आली.

आतापर्यंत थोडीफार सौम्य बॉडी लाईन बॉलिंग केलेल्या इंग्लंडने खऱ्या अर्थाने तिसऱ्या ऍडलेड टेस्टपासून ऑस्ट्रेलियाला घाबरवले. लारवूड यांचा एक वेगवान बॉल कॅप्टन विलफुड यांच्या छातीवर लागला. मॅच पंधरा मिनिटांसाठी थांबली. थोडेफार उपचार घेत ते पुन्हा उभे राहिले आणि 73 रन्सची इनिंग खेळली. इकडे प्रेक्षकांनी लारवूड आणि जार्डिन यांच्या नावाने हुटिंग सुरू केलेली. लारवूड मागे हटण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी आपली ती घातकी बॉलिंग तशीच सुरू ठेवली. बर्ट ओल्डफील्ड यांना मारलेला एक बाऊंसर थेट त्यांच्या कवटीवर जाऊन आदळला. कवटीला फ्रॅक्चर झालं. ऍडलेडमधील प्रेक्षक लारवूडवर हल्ला करण्यास तयार झालेले.‌ अखेर सुरक्षारक्षकांच्या गराड्यात त्यांना बाहेर गेले गेले. त्या मॅचनंतर सीरिज थांबवली गेली. देशातील राजकीय मतभेदही वाढले. जवळपास महिनाभरानंतर पुन्हा उरलेल्या दोन टेस्ट खेळल्या गेल्या. त्याही इंग्लंडने जिंकल्या. विशेष म्हणजे, बॉलिंगने सीरिज गाजवणारे लारवूड शेवटच्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये चमकले.

इतक्या साऱ्या विवादातही डग्लस जार्डिन आणि लारवूड यांना झाल्या प्रकाराचा थोडाही पश्चाताप नव्हता. लारवूड तर इथपर्यंत बोलून गेले की, मैदानावर अशाप्रकारे रक्त पाहायला मला खूप आवडते. विशेष म्हणजे, ज्या बॉलने ओल्डफील्ड यांची कवटी फुटली तो बॉल 10 हजार पाऊंडना विकला गेला. इंग्लंडने ती सीरिज 4-1 ने जिंकत ऍशेस नेली खरी, पण विस्डेनने ऍडलेड टेस्टला ‘क्रिकेट इतिहासातील काळा दिवस’ म्हणून अंकित केले. आज 90 वर्षानंतरही ती ओळख पुसली गेली नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---