“जर तुझ्यासमोर ग्लेन मॅकग्रा गोलंदाजीला आला तर काय करशील? ”
असा प्रश्न एका युवा खेळाडूला विचारला गेला. त्यावर त्याने उत्तर दिले,
“फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये असेल तर स्वीप खेळेल.”
त्याच्या उत्तराने सगळे हसायला लागले. मॅकग्रासारख्या बुद्धिमान, एकाच जागेवर दिवसभर टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला स्वीप मारणे हे एक दिवास्वप्नच होते. जेव्हा खरच मॅकग्रा त्याच्यासमोर आला तेव्हा त्याने हे करून देखील दाखवले. त्याचा संघ जिंकू शकला नाही. पण त्या खेळाडूने मॅकग्राला शेवटच्या षटकामध्ये १३ धावा फटकावल्या होत्या.
३०३ धावांचा पाठलाग करताना संघ ३०१ पर्यंत पोहचला. पण त्या १२ धावांमुळे आणि त्यातही त्या धावा ज्याप्रकारे बनविले गेले, त्या कारणाने तो युवा खेळाडू मात्र प्रसिद्ध झाला. तो विचीत्र शॉट त्या खेळाडूच्या नावाने ओळखला जावू लागला. तो शॉट होता, ‘मरीलियर स्कूप’ आणि तो शॉट खेळणारा खेळाडू होता झिम्बाब्वेचा डग्लस मरीलियर.
डग्लसचे पिता पोलिस होते पण त्याच बरोबर ते क्रिकेटही खेळायचे. आपल्याकडे बाळांची पाचवी पुंजतात तसेच, डग्लस अवघा आठ दिवसाचा असताना, तो पुढे क्रिकेटर व्हावा म्हणून बापाने त्याचा हाती बॉल दिलेला. त्याचा भाऊ सुद्धा विकेटकीपर म्हणून क्लब क्रिकेट खेळायचा. पोरगा क्रिकेटरच व्हावा ही वडिलांची इतकी प्रबळ इच्छा होती की, त्यांनी डग्लसचे ऍडमिशनसुद्धा त्याच शाळेत केले जेथे झिम्बाब्वेचे महान क्रिकेटर्स फ्लॉवर बंधू शिकले.
डग्लस सोळा वर्षांचा असताना त्याचा कार एक्सीडेंट झाला. तो जवळजवळ वर्षभर व्हीलचेअरवर राहिला. डॉक्टरांनी सांगितले, आता हा चालूसुद्धा शकणार नाही. थोडा रिकव्हर झाल्यावर डग्लस व्हीलचेअरवर बसून ग्राउंडमध्ये जायचा. खेळता येत नसायचे म्हणून अंपायरिंग करायचा. क्रिकेटप्रती एकनिष्ठ राहत तो दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा मैदानावर परतलाच.
अंडर नाईन्टीन संघाकडून जोरदार खेळ दाखवल्यावर २००० मध्ये त्याची झिम्बाब्वे नॅशनल टीममध्ये एन्ट्री झाली. पदार्पणात वनडेला तो सलामीवीर म्हणून आला. पण कुणास ठाऊक त्याची फलंदाजी पोझिशन का सातत्याने खाली-खाली जाऊ लागली. अशात वर सांगितलेली त्याची मॅकग्राविरूद्धची त्याची ती पाच चेंडू १२ धावाची खेळी २००१ मध्ये पर्थच्या वाकावर आली. तिथेच त्या मरिलीयर स्कूपचे साऱ्यांना दर्शन झाले.
मरिलीयर स्कूपचा पुढचा तडाखा खायची वेळ भारतीय संघाची होती. २००२ च्या टूरसाठी झिम्बाब्वे संघ भारतात आली. सिरीजची पहिली मॅच ७ मार्चला फरीदाबादमध्ये होती. कर्णधार गांगुली, लक्ष्मण आणि आगरकरने भारी बॅटिंग करत टीम इंडियाला २७४ पर्यंत नेले. आता आपली त्यावेळची बॉलिंग लाईन अप बघून कोणीही म्हटल असतं मॅच आपणच जिंकणार. पावणे तीनशे रनांचा पाठलाग करताना कॅम्पबेल आणि ऍण्डी फ्लॉवरने फिफ्ट्या मारल्या. तरीपण ७ विकेट गेलेल्या आणि त्यांना ६ ओव्हरमध्ये ६६ रन्स पाहिजे होत्या. आता हे टारगेट सोपं वाटतं. पण तेव्हा याची कल्पनाही कोणी करत नव्हतं, तेही शेपटाच्या भरोशावर.
४५ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर डियान इब्राहिम आऊट झाल्यावर दहाव्या नंबरवर बॅटिंगला आला डग्लस मरिलीयर. दोन ओव्हरीत मरीलीयरने तीन फोर मारून सतरा रन वसूल केले. तरीही जिंकायला हव्या होत्या ४ ओव्हर ४९ रन्स. ४७ वी ओवर घेऊन आला युवा झहीर खान. पहिल्या दोन बॉलवर मरीलियरने ६ रन्स काढल्या, ज्यात झहीरने एक नो बॉल टाकत मरीलियरला सहकार्य केले. पुढचा बॉलसुद्धा झहीरने नो बॉल टाकला आणि भारतीयांनी पहिल्यांदा हा विचीत्र शॉट पाहिला.
विटीदांडूसारखे उभे राहून मरीलियरने विकेटकीपरच्या डोक्यावरुन बॉल उडवत दोन रन घेतल्या. पुढचा बॉल यॉर्कर टाकत झहीरने पुनरागमन केले खरे. मात्र तिसऱ्या बॉलवर मरीलियरने स्वीप खेळत सिक्स मारत आणि चौथ्या बॉलवर स्वतःचा ‘मरीलियर स्कूप’ दाखवत बाऊंड्री वसूल करत झहीरची हवाच काढून घेतली. सारं समीकरण बदललं होतं. १८ बॉलवर पाहिजे होत्या २८ रन्स. संजय बांगरने पुढची ओवर एक विकेट आणि फक्त पाच रनांची टाकून सगळ्यांना धीर दिला.
कदाचित तो दिवस झहीरचा नव्हता. ४९ व्या ओव्हरमध्ये मरिलीयरने दोन मरिलीयर स्कूपचे फॉर मारत तेरा रन्स काढले. लास्ट ओव्हरच्या पहिल्या आणि पाचव्या बॉलला फोर मारुन मरिलीयरने झिम्बाब्वेला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अख्खा भारत मरिलीयरचा फॅन झाला. सॅमी कार्टर यांच्यानंतर तब्बल १०० वर्षाचा काळ लोटून गेल्यावर क्रिकेटमध्ये स्कूपचे पुनरुज्जीवन झाले, आणि त्याचे श्रेय दिले गेले डग्लस मरिलीयरला.
पुढे त्याला म्हणावं तसं सातत्य दाखवता आलं नाही. २००४ ला झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड व खेळाडू यांच्यात जो वाद झाला त्यावेळी क्रिकेट सोडणाऱ्या खेळाडूंमध्ये मरीलियर सामिल होता. झिम्बाब्वे सोडल्यानंतर २००४ मध्ये रिटायरमेंट घेत मरीलियर इंग्लंडला गेला. पण तिथेही काही मोठे न करता आल्याने पुन्हा मायदेशी परतला. त्याने घरच्या रियल इस्टेटच्या व्यवसायात हात आजमावले. २००९ ला फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये यायचा त्याने प्रयत्न केला पण तोही फसला. शेवटी त्याने फुलटाइम बिझनेसमन व्हायचा निर्णय घेतला आणि आजपर्यंत तेच करतोय. आजच्या टी२० च्या जमान्यात नानातर्हेचे शॉट पाहून नवक्रिकेटप्रेमी चकित होतात. पण त्या मरिलियर स्कूपची बात काही औरच!!!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा
रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…