आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. सध्या बीसीसीय इतकी पावरफुल आहे की, क्रिकेटची शिखर संस्था आयसीसीदेखील एखादा मोठा निर्णय घेण्याची हिंमत करत नाही. मागच्या पंधरा वर्षात बीसीसीआयने क्रिकेट जगतावर जवळपास कब्जा केलाय. मात्र, 70-80 च्या दशकात अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी क्रिकेटच्या दोनच महासत्ता होत्या एक इंग्लंड दुसरी ऑस्ट्रेलिया. त्यातही काहीसा इंग्लंडचाच वरचष्मा. इंग्लंडच्या या वर्चस्वाला धक्का देण्याचं पहिलं काम केलं भारताने. मात्र, भारताने ही गोष्ट कशी साध्य करून दाखवली याचीच आजची कहाणी.
हा किस्सा सुरू होतो 1983 वर्ल्डकपपासून. सलग तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये वर्ल्डकप आयोजित केला गेलेला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना कपिल देव (Kapil Dev) यांची टीम इंडिया सेमी फायनलपर्यंत आली. सेमी फायनलला समोर होते यजमान इंग्लंड. टीम इंडियाने आपला विजयरथ असाच पुढे नेत इंग्लंडला चिरडले. इंग्लंडच्या वर्मी घाव लागला. त्यांना हा पराभव सहन झाला नाही. टीम इंडियाची फायनल होणार होती वेस्ट इंडिजविरूद्ध. या ऐतिहासिक फायनलसाठी बीसीसीआयला काही तिकिटे दिली गेलेली. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष होते नरेंद्र कुमार साळवे. भारतातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि भारत सरकारमधील कॅबिनेट मंत्री. ते देखील ही फायनल पाहण्यासाठी लॉर्ड्सवर पोहोचले. त्यांनी तिथे आयोजकांना आणखी काही पासेस मागितले. मात्र, आधीच भारतावर खार खाऊन असलेल्या आयोजकांनी चक्क त्यांना पास देण्यास नकार दिला. हा साळवे यांना आपला अपमान वाटला. ते फायनल पाहत बसले मात्र त्यांच्या डोक्यात वारंवार ती घटना फिरत होती.
पुढे टीम इंडियाने तो वर्ल्ड कप जिंकला. सगळीकडे आनंदी आनंद होता. या वर्ल्डकप विजयानंतर एक पार्टी आयोजित केली गेलेली. या पार्टीला खेळाडू, बीसीसीआय ऑफिशियल्स, सेलिब्रिटी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चीफ नूर खान यांना आमंत्रित केले गेलेले. त्या लंच टेबलवर सर्वांची चर्चा सुरू होती. मात्र, साळवे यांना ती फायनलची आठवण अजूनही खात होती. त्यांनी त्याच टेबलवर म्हटले, “भारतात वर्ल्डकपसारखी मोठी टूर्नामेंट आयोजित व्हायला हवी.” त्यावर नूर खानही तसेच म्हणाले, “आपण आपल्या देशात वर्ल्ड कप का खेळू नये?”
फाळणी होऊन दोन देश निर्माण झाले असले तरी क्रिकेट या दोन्ही देशांना जोडण्याचं काम करत होतं. तिथेच साळवे यांनी “भारत आणि पाकिस्तानने एकत्र वर्ल्ड कप आयोजित केला तर कसं होईल?” असा प्रश्न विचारला. यावर नूर खान थोडेसे विचारात पडले. कारण, ही गोष्ट बोलायला सोपी असली, तरी प्रत्यक्षात घडणे म्हणजे पहाड फोडण्यासारखे होते.
वर्ल्डकप भारतात आणण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडे असलेले विटो पावर. सारं काही पद्धतशीर करण्याचा प्लॅन साळवे यांनी बनवला. भारत आणि पाकिस्तानमधील ऑफिशियल्सची त्यांनी एक जॉईन्ट कमिटी बनवली. साळवे त्याचे अध्यक्ष बनले. त्यावेळी बीसीसीआयचे खजिनदार होते जगमोहन दालमिया. दालमिया यांनी एक मेख शोधून काढली. त्यांनी माहिती मिळवली की 28 देश आयसीसीचे सदस्य आहेत. त्यातील फक्त सात देश टेस्ट क्रिकेट खेळतात. त्यांनी याच देशांना आमीष दाखवलं. टेस्ट खेळणाऱ्या देशांना इंग्लंडपेक्षा चारपट अधिक आणि इतर देशांना पाचपट अधिक रक्कम देण्याचं त्यांनी जाहीर केलं. ही ऑफर ऐकून आयसीसी चकीत झालेली. खरंतर बीसीसीआय पुढेही मोठा प्रश्न होता की, पैसे देण्याचे जाहीर केलं खरं मात्र पैसे येणार कुठून?
भारतातल्या विविध मोठ्या बिजनेस ग्रुपसोबत बीसीसीआयची मीटिंग झाली. हिंदुजा ग्रुप, कोकाकोला, जिलेट यांनी स्पॉन्सरशिप करण्यासाठी तयारी दर्शवली व लिलाव झाला. बीसीसीआयला मिळाले केवळ 37 लाख. मात्र, इतक्या मोठ्या आयोजनासाठी हवे होते जवळपास 4 कोटी रुपये. या सर्वात एन्ट्री झाली धीरूभाई अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची. धीरूभाईंनी त्यावेळी भारतीय टेक्सटाईल मार्केटमध्ये आपलं नाव बरंच मोठं केलं होत. त्यांनी वर्ल्डकपला स्पॉन्सर करण्याचा निर्णय घेतला. धीरूभाईंचे लहान सुपुत्र अनिल अंबानी यांनी हा संपूर्ण प्रोजेक्ट लीड केला. त्यांनी बीसीसीआयला 2.2 मिलियन डॉलर्स दिले.
रिलायन्सने स्पॉन्सरशिप दिल्यानंतर अनेक विदेशी कंपन्यांनी आणखी रक्कम देऊ केली. मात्र, साळवे यांनी “आम्हाला वेळीच मदत करणाऱ्या रिलायन्सशिवाय आम्ही कोणालाही स्पॉन्सरशिप देणार नाही” असे ठणकावून सांगितले. पैशांची व्यवस्था झाल्यानंतर, ज्यावेळी वर्ल्डकप आयोजनासाठी मतदान घेतले गेले, तेव्हा भारत-पाकिस्तानच्या बाजूने 16-12 असा निकाल लागला. बीसीसीआय आणि पीसीबीने इंग्लंड बाहेर झालेला पहिला वर्ल्डकप कमालीचा यशस्वी करून दाखवला. सोबतच पुढे इतर साऱ्या देशांना वर्ल्डकप आयोजनाचे द्वार खुले करून दिले. हे सर्व शक्य झाले केवळ एनकेपी साळवे यांच्या जिद्दीने आणि जगमोहन दालमियांच्या हुशारीने.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विंडीजच्या दिग्गजाने मनाचा मोठेपणा दाखवताच हुकलेली सेमीफायनल, पाकिस्तानी जनरलकडून मिळालं होतं गिफ्ट
क्रिकेटप्रेमींसाठी खास आर्टिकल: ‘ती’ अजरामर मॅच, ज्यात भारत-पाकिस्तानचे क्रिकेटर खेळलेले एकत्र