भारतीय महिला क्रिकेट संघाची २२ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटिया जागतिक क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून ओळखली जाते. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास फार कमी लोकांना माहित आहे.
तानियाचा जन्म २८ नोव्हेंबर १९९७ ला चंदिगढ़, पंजाब येथे झाला. तिला क्रिकेटचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. तिचे वडील संजय भाटिया देखील क्रिकेट खेळायचे. ते सुद्धा यष्टीरक्षक होते. तसेच ऑल इंडिया यूनिवर्सिटी स्थरापर्यंत क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी तानियामधील क्रिकेटचे कौशल्य ती ७ वर्षांची असतानाच ओळखले होते. त्यांची इच्छा होती की तानियाने वेगवान गोलंदाज बनावे. पण तानियाला यष्टीरक्षणात अधिक रस होता. तसेच तिची उंची इतकी वाढली नाही की ती वेगवान गोलंदाज बनेल. त्यामुळे तिने यष्टीरक्षणावरच लक्ष केंद्रित केले.
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट तानियाचा आदर्श आहे. तिने द ब्रिजला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिने लहानपणापासून गिलख्रिस्टला आदर्श मानले होते. तसेच तो जेव्हा आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघासोबत होता तेव्हा तिला त्याला मोहालीत भेटण्याची संधी मिळाली होती.
तानियाची क्रिकेटची आवड पहाता तिच्या वडिलांनी तिचे चंदीगड येथील डीएव्ही वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात ऍडमिशन केले. तिथे युवराजचे वडिल योगराज सिंग ट्रेनिंग देत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने चांगली प्रगती केली. तिने तिथील प्रशिक्षणानंतर वयाच्या ११ व्या वर्षी पंजाबचे ट्रायल्स दिले होते. तिची पंजाबच्या १९ वर्षांखालील संघात निवडही झाली होती.
२०१५ मध्ये तिने इंटर झोन क्रिकेट स्पर्धेत नॉर्थ झोनच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले होते. त्यावेळी तिने २२७ धावा केल्या होत्या आणि यष्टीमागे १० विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच तिने १६ व्या वर्षीच पंजाबच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले. काही दिवसातच तिला भारतीय अ संघातही स्थान मिळाले होते.
परंतु काही दिवसांनंतर तिचा फॉर्म गेल्याने तिला देशांतर्गत तर भारत अ संघातील स्थानही गमवावे लागले. पण तिनेही हार न मानता सराव केला. तिने तिच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित केले. यासाठी तिच्या पालकांनी तिला पूर्ण सहकार्य केले होते. विशेष म्हणजे जेव्हा लहानपणापासून तानिया क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती तेव्हा तिचे वडील कामानिमित्त बाहेर असताना तिच्या आईने तिला सरावासाठी ने-आण करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली होती.
प्राण्यांची आवड असलेल्या तानियाने पुढे तिच्या मेहनतीच्या जोरावर अखेर २०१८ मध्ये भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले. तिला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारतीय महिला टी२० संघात स्थान मिळाले. त्यावेळी तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३ फेब्रुवारी २०१८ ला टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच तिने त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून वनडेमध्येही पदार्पण केले. एवढेच नाही तर तिने २०२० ला ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघातही स्थान मिळवले होते.
वाचनीय लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
१०व्या नंबरवर फलंदाजीला येत एकट्याच्या जीवावर भारताला दिवसा चांदण्या दाखवणारा अवलिया क्रिकेटर