Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच देणारे ‘बॉब वूल्मर’, पाकिस्तानचे हेड कोच असतानाच झालेला रहस्यमयी मृत्यू

क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच देणारे 'बॉब वूल्मर', पाकिस्तानचे हेड कोच असतानाच झालेला रहस्यमयी मृत्यू

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Bob-Woolmer

Photo Courtesy: Twitter/ICC


बॉब वूल्मर. हे नाव ऐकताच कान टवकारणार नाही असा एकही क्रिकेटप्रेमी नसेल. बॉब वूल्मर यांच्या नावाचा उल्लेख होताच सर्वांना 2007 मध्ये वेस्ट इंडीजच्या मैदानांवर झालेला वर्ल्डकप आठवतो. तो वर्ल्डकप जितका रटाळ झाला तितकाच गाजला बॉब वूल्मर यांच्या आकस्मित मृत्यूमुळे. पाकिस्तानचे हेड कोच म्हणून गेलेल्या वूल्मर यांचा स्पर्धेच्या दरम्यानच संशयास्पद मृत्यू झाला. खून, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू? या प्रश्नाचे उत्तर बरेच दिवस मिळत नव्हते. त्या संपूर्ण वर्षातील ते सर्वात हाय प्रोफाईल प्रकरण होते. क्रिकेटविश्वातील एका मान्यवर कोचचा असा मृत्यू होणे दुर्दैवी होते. मात्र, वूल्मर यांच्या नावाभोवती इतके मोठे वलय होते, याचे कारण काय? त्यांचा खेळाडूचे एक जागतिक कीर्तीचा क्रिकेट कोच असा प्रवास कसा झाला याची ही कहाणी.

इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणाऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कोच असणाऱ्या बॉब वूल्मर (Bob Woolmer) यांचा भारताशी जन्माआधीपासून संबंध. वूल्मर यांचे वडील इंग्लिश सैन्यात अधिकारी होते. इंग्रजांनी भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य दिले. मात्र, सर्वच इंग्रज त्यावेळी आपल्या देशात परतले नाहीत. टप्प्याटप्प्याने अनेक जण इंग्लंडमध्ये जात होते. वूल्मर यांचे वडील युनायटेड प्रोविअन्स म्हणजे उत्तर भारतातील टीमसाठी रणजी खेळायचे. त्यांचे कानपूर येथे वास्तव्य होते.‌ 1948 मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या शेजारी असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र, पुढे दोन वर्षातच वूल्मर कुटुंब इंग्लंडला परतले.

क्रिकेट वूल्मर यांच्या रक्तात होते. ते देखील क्रिकेट खेळू लागले आणि शाळेच्या टीमपर्यंत पोहोचले. विसाव्या वर्षी केंटसाठी काऊंटी खेळण्यास त्यांनी सुरुवात केली. इंग्लंडमध्ये त्यावेळी कोणीही फुल टाइम क्रिकेटर नसायचे. त्यासाठीच वूल्मर पीटी टीचर बनले. बाविसाव्या वर्षी त्यांनी कोचिंग द्यायला सुरुवात केली. ती देखील दूर दक्षिण आफ्रिकेत जाऊन. 1972 ते 1976 या काळात त्यांना इंग्लंडच्या वनडे टीममध्ये कधीकधी चान्स भेटायचा. ते दक्षिण आफ्रिकेतही खेळायचे. मात्र कॅरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीजमध्ये गेल्यावर वनडे संघाचे दार त्यांच्यासाठी बंद झाले. 1981 मध्ये आपली 19वी आणि शेवटची टेस्ट खेळून त्यांनी क्रिकेटर म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेटर म्हणून थांबले असले तरी त्यांनी पुढचे शिवधनुष्य उचलले क्रिकेटर्स घडवण्याचं. अनेकांना विश्वास बसणार नाही मात्र त्यांनी आपल्या कोचिंगच्या सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेत हॉकी प्लेयर्सना ट्रेनिंग दिलेले. पुढे वार्विकशायरसाठी त्यांनी कोचची भूमिका बजावली. इंग्लंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमधील चारपैकी तीन ट्रॉफी वार्विकशायरने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकल्या. याच काळात त्यांना एक दुग्धशर्करा योग पाहायला मिळाला. 1958 मध्ये पाकिस्तानच्या हनिफ मोहम्मद यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च 499 रन्सची इनिंग खेळली होती. ती मॅच 10 वर्षांच्या वूल्मर यांनी ग्राउंडवर पाहिलेली. बरोबर 35 वर्षानंतर ब्रायन लाराने डरहॅमविरूद्ध 501 रन्स करून तो वर्ल्ड रेकॉर्ड तोडला. त्यावेळी वूल्मर वार्विकशायरच्या डग आऊटमधून कोच म्हणून टाळ्या वाजवत होते.

त्यांची ही सफलता पाहून नव्याने क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्यांना आपले हेडकोच बनवले. सुरुवातीला त्यांना अपयश आले. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या यशाची गाडी सुसाट सुटली. क्रिकेट जगतात कंम्प्युटर वापरणारे ते पहिले कोच. क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच त्यांनीच दिला. 1999 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिएशी इयर पीस घालून ते बोलत होते. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले. दुर्दैवाने एक तगडी टीम आणि करिष्माई कोच असतानाही दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकप फायनल गाठता आली नाही.

वूल्मर यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी केलेल्या कामाने आयसीसी खुश होती. आयसीसीने वूल्मर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली. 2001 मध्ये केनिया, कॅनडा, नेदरलँड, नामिबिया अशा असोसिएट्स देशांच्या टीम्सना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं. जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली.‌ त्यांच्या मार्गदर्शनानंतर 2003 वर्ल्डकपमध्ये केनियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यानंतर सर्वात अवघड जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली पाकिस्तान संघाची. अनेक संकटातून चाललेल्या पाकिस्तान क्रिकेटला सावरायचे काम त्यांनी केले. त्यांनी टीम एकत्र केली. शोएब अख्तरने त्यांच्या श्रीमुखात मारल्याची बातमी मोठ्या प्रमाणात पसरलेली. मात्र, त्या दोघांनी स्वतः पुढे या गोष्टीचा इन्कार केला.

त्यानंतर आला 2007चा वर्ल्डकप. पाकिस्तान ग्रूप डी मध्ये होता. यजमान वेस्ट इंडिजने त्यांना हरवले. मात्र, त्यापेक्षा मोठा धक्का होता दुसऱ्या मॅचमध्ये बसलेला. पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळत असलेल्या आयर्लंडने पाकिस्तानला हरवायची कामगिरी केलेली. पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर झालेला. त्यानंतर उजाडली 18 मार्चची दुर्दैवी सकाळ. वूल्मर त्यांच्या हॉटेल रूममध्ये मृतावस्थेत आढळलेले. त्यांचा गळा दाबून खून केल्याचे पहिल्यांदा सांगितले गेले. पुढे आणखी तपास केला गेला आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आज 15 वर्षानंतरही त्यांचा मृत्यू नक्की कसा झाला? याबाबत कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.

वूल्मर यांचा जन्म झालेले कानपूरमधील हॉस्पिटल ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्याला वूल्मर स्ट्रीट असे नाव दिले गेले. पाकिस्तानात सितारा ए इम्तियाज पुरस्कार त्यांना दिला गेला. परंतु, वूल्मर यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात एक पोकळी निर्माण झाली ती कायमची. क्रिकेटचा एक महान सेवक जगाने अकाली गमावला होता!

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Monkeygate Scandal: भारतीय खेळाडू, बीसीसीआय, कोर्ट आणि मीडियाला सांभाळत भज्जीला वाचवणारा ‘डॉक्टर’
वर्षभर टीमला लीड करणाऱ्या धुरंधराच्या जागी विराटला का बनवलेलं U-19 संघाचा कर्णधार? जरूर वाचा


Next Post
Aishwarya-Jadhav

भारतीय महिला टेनिसच्या क्षितिजावर 'ऐश्वर्या'च्या रूपात नवीन तारा, कोल्हापूरच्या लेकीची विम्बल्डनपर्यंत मजल

Hong-Kong-Cricket-Team-Sink

क्रिकेटच्या इतिहासातील दुर्दैवी घटना! जहाज बुडाल्याने देशाची संपूर्ण क्रिकेट टीम पडलेली मृत्यूमुखी

Irani Cup

इंडियाने जिंकला इराणी कप, यशस्वी जयस्वालने द्विशतकाच्या मदतीने दिले 357 धावांचे योगदान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143