fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पदार्पणातच शतक करणाऱ्या २ भारतीय महिला क्रिकेटर, एक झाली रनमशीन तर दुसरीच्या नशिबी आल्या…

26  जून 1999 साली आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या दोन महिला सलामीच्या फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिल्टन केयन्स येथे झालेल्या सामन्यात दोघांनीही शतक ठोकून आपले पदार्पण गाजवत एक नवा विक्रम रचला. या दोन्ही खेळाडूंपैकी एक महिला क्रिकेटपटू रनमशीन बनली तर दुसरी महिला खेळाडू  जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकू शकली नाही.

या दोन्ही खेळाडूंमधील एक म्हणजे मिताली राज. मिताली ही सर्व क्रिकेट प्रेमींना परिचित आहे. मिताली तेव्हा 16 वर्षांची होती. आयर्लंडविरुद्ध खेळताना पहिल्या सामन्यात नाबाद 114 धावांची शतकी खेळी केली. यासोबतच तिची सहकारी खेळाडू रेश्मा गांधीने वयाच्या 24व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

रेश्माने ही आपल्या पहिल्याच सामन्यात 104 धावांची नाबाद शतकी खेळी केली. यासोबत त्या महिला क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या वनडे सामन्यात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली. रेश्माने शतक ठोकल्यानंतर मितालीने शतक पूर्ण केले होते. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात 16 डिसेंबर 1974साली रेशमाचा जन्म झाला होता.

भारतीय पुरुष संघाकडून खेळताना पहिल्यांदा केएल राहुल याने पदार्पणाच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते.  2016 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना हरारे येथे नाबाद शतकी खेळी केली. त्यापुर्वी तब्बल १७ वर्ष आधी मिताली व रेश्माने हा कारनामा केला होता.

मिताली आणि रेश्माने त्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 258 धावांची भागीदारी केली. हा विक्रम नऊ वर्षांपर्यंत त्यांच्या नावावर होता. हा सामने भारताने 161 धावांनी जिंकला. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातला हा सर्वात मोठा विजय होता. त्यानंतर मिताली भारताच्या संघातील प्रमुख फलंदाज बनली.

मितालीने आतापर्यंत भारतीय संघाकडून 209 वनडे सामने खेळले आहेत. तसेच दोनशेपेक्षा जास्त वनडे सामने खेळणारी ती जगातली एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.

मितालीच्या नावावर वनडेमध्ये 6888 धावांची नोंद आहे. जो एक विश्वविक्रम आहे. 50.64 च्या सरासरीने खेळत 7 शतके आणि 53 अर्धशतके ठोकली आहेत. सर्वाधिक अर्धशतके ठोकणारी ती जगातली एकमेव फलंदाज आहे. सलग 109 वनडे सामने खेळण्याचा जागतिक विक्रम तिच्या नावावर आहे.

एकवीस वर्षांपूर्वी तिच्यासोबतच क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारी रेश्मा गांधी केवळ दोनच आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकली. रेश्मा ही प्रामुख्याने यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यावेळी भारतीय संघात अंजू जैनसारखी अनुभवी यष्टीरक्षक संघात होती. त्या दौऱ्यात इंग्लंडविरुद्धच्या पुढच्या सामन्यात अंजू जैनचे संघात पुनरागमन झाले आणि रेश्माला संघाबाहेर ठेवण्यात आले.

मितालीने पुढच्या दोन सामन्यात अनुक्रमे 4 आणि 0 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात रेश्माला पुन्हा एकदा फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले. मात्र तिला फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर उतरवण्यात आले. या सामन्या तिने नाबाद 18 धावा केल्या. हा तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रेश्माने ‘अ’ दर्जाच्या 13 सामन्यात 38.42 च्या सरासरीने धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

You might also like