हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले. भारतीय संघाचा केवळ ७८ धावांवर खुर्दा उडवल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी नाबाद १२० धावा बनवून इंग्लंडला ४२ धावांची आघाडी मिळवून दिली. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या अपयशाची मालिका या सामन्यात देखील कायम राहिली. विराट एकेरी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर यांनी विराटला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
पुन्हा अँडरसनचा शिकार ठरला विराट
जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटला जाणारा विराट मागील काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चार डावात तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावातही १७ चेंडूंचा सामना करत तो कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याच्या नादात ७ धावांवर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. अँडरसनने चार डावात त्याला दुसऱ्यांदा बाद केले आहे.
गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला
भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर व समालोचक सुनील गावसकर यांनी प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हटले, “विराटने पटकन सचिन तेंडुलकरला फोन करून विचारायला हवे की मी काय करावे? सचिनने सिडनी कसोटीत जे केले होते ते विराटने केले पाहिजे. त्याने स्वतःलाच सांगायला हवे की मला कव्हर ड्राईव्ह खेळायचा नाही.”
सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सातत्याने अपयशी ठरत असताना सिडनी कसोटीत ४३६ चेंडूचा सामना केल्यानंतरही एकही कव्हर ड्राईव्ह खेळला नव्हता. सचिनने या कसोटीत २४१ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. सध्या विराट खराब फॉर्ममधून जात आहे. नोव्हेंबर २०१९ पासून तो एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला रुट आता मियाँदादचा ‘हा’ मोठा विक्रमही काढू शकतो मोडीत
‘भाऊ, माझा भाला परत दे’, जेव्हा नीरजला फायनलआधी पाकिस्तानी खेळाडूकडून मागावा लागला स्वत:चा भाला