आंतरराष्ट्रीय पातळीवर २००५ सालापासून टी२० क्रिकेटचा उगम झाला. त्यानंतर टी२० क्रिकेटच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. कमी कालावधीचा सामना असल्याने आणि आकर्षक क्रिकेटची मेजवानी मिळत असल्याने चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर टी२० क्रिकेट पाहायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी क्रिकेटच्या मूळ तत्त्वांना यामुळे धक्का लागत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. विशेषतः माजी खेळाडूंना क्रिकेटचे हे स्वरुप फारसे पसंत पडले नाही.
मात्र याला अपवाद ठरले आहेत ते भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर. त्यांनी टी२० क्रिकेट आपल्या काळातील खेळाडूंना फारसे आवडत नसले तरी त्यातील अॅक्शनमुळे स्वतःला टी२० क्रिकेट पाहायला आवडत असल्याचे विधान केले. यावेळी त्यांनी टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचे नाव देखील सांगितले आहे.
“टी२० क्रिकेट मला पसंत आहे”
आत्तापर्यंत अनेक माजी खेळाडूंनी टी२० क्रिकेटला विरोध दर्शवला आहे. कसोटी क्रिकेटवर टी२० क्रिकेटमुळे नकारात्मक परिणाम होतो आहे, असे मत या खेळाडूंनी मांडले आहे. मात्र सुनील गावसकर यांनी याच्या अगदी विरूद्ध मत मांडले आहे. ते म्हणाले, “मला माहिती आहे की माझ्या काळातील अनेक खेळाडूंना टी२० प्रकार पसंत नाही. पण मला मात्र टी२० क्रिकेट आवडते. कारण यात केवळ तीन तासांचा सामना खेळवला जातो आणि तुम्हाला लवकर निकाल मिळतो. यात विशेषतः कोणी स्विच हिट किंवा रिव्हर्स स्वीपचा फटका मारतात, तेव्हा मी त्याचा खूप आनंद घेतो. कारण निश्चितच अशा प्रकाराचे फटके खेळण्यासाठी खास प्रतिभा असावी लागते.”
‘हा’ आहे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज
सुनील गावसकर यांनी यावेळी त्यांच्या मते टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असलेल्या फलंदाजाचे देखील नाव सांगितले. हा फलंदाज विराट कोहली किंवा रोहित शर्मा नसून दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे. यामागील कारण सांगतांना गावसकर म्हणाले, “डिव्हिलियर्स अशा प्रकारचा फलंदाज आहे, जो प्रत्येक प्रकारचा फटका खेळू शकतो. तो अतिशय नेत्रसुखद फटके खेळतो. त्यामुळे मला त्याची फलंदाजी पाहायला नेहमीच आवडते.”
महत्त्वाच्या बातम्या-
कमालच! सहा वर्षांचा चिमुकला चक्क धोनी स्टाइलमध्ये मारतो आहे हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडिओ
इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो हा महत्वाचा बदल
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! लॉर्डस कसोटीत दिसून आली न्यूझीलंडची ही कमजोरी