इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी २७ सप्टेंबर रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. दरम्यान या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पराभवाची साखळी मोडत राजस्थान रॉयल्स संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला अवघ्या एक सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. त्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात देखील या संघाला चांगली सुरुवात करता आली नव्हती. सलग २ सामन्यात पराभूत झाल्यानंतर या संघाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने शेवटचा विजय २१ एप्रिल २०२१ रोजी पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मिळवला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्स संघाला ९ गडी राखून पराभूत केले होते.
त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध मिळवलेला विजय हा या संघासाठी खूप खास ठरला. हा विजय मिळवल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेले सनरायझर्स हैदराबादचे समर्थक आणि डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू भलतेच खुश झाले होते. तर फलंदाजी करत असलेला कर्णधार केन विलियम्सन विजय मिळवल्यानंतर भावूक झाला होता.या विजयानंतर ख्रिस मॉरिसने देखील त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
????????????#SRHvRR #VIVOIPL https://t.co/TN3tS5tx56 pic.twitter.com/ZiKBBT1MuW
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2021
सनरायझर्स हैदराबाद संघाचा ७ गडी राखून विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ३६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना जेसन रॉयने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली होती. तर केन विलीयमसनने नाबाद ५१ आणि अभिषेक शर्माने नाबाद २१ धावांची खेळी करत सनरायझर्स हैदराबाद संघाला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.