fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मी सांगतोय ना! अकमल पुढच्या बॉलवर आऊट होईल, गम्मत म्हणजे झालंही तसंच

मुंबई । भारताचा स्टायलिश डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली सुरू केली. 33 वर्षीय रैना अफलातून क्षेत्ररक्षका सोबतच एक आक्रमक फलंदाज देखील आहे. अविस्मरणी झेल आणि खेळी करून भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. 

दरम्यान, सुरेश रैनाने राहुल द्रविड किती जीनिअस (हुशार) कर्णधार होता याचे उदाहरण देत खुलासा केला आहे. रैनाने  2006 साली झालेल्या वनडे सामन्यात घडलेली एक घटना सांगितली.

पाकिस्तानचा संघ फलंदाजी करण्यास मैदानात उतरला. राहुल द्रविडने आक्रमक फलंदाज कमरान अकमलला बाद करण्यासाठी योजना आखली.

“पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात घेतलेला तो झेल मला आजही आठवतो. राहुल द्रविड आमचा कर्णधार होते. इरफान पठाण गोलंदाजी करत होता. राहुल भाईने मला पॉईंटवर क्षेत्ररक्षण करणार का? असे विचारले. मी लगेच हो म्हणत त्या ठिकाणी गेलो. त्यांनी मला थोडेसे वाकून थांबत कॅच घेण्यास तयार राहण्यास सांगितले. राहुल भाईने कमरान अकमल विरोधात केलेली योजना कामी आली.

इरफान पठाणने कामरान अकमलला फटका मारण्यास थोडी जागा दिली. त्यानंतर कामरान अकमलने फटका मारला आणि थेट सुरेश रैनाच्या हातात चेंडू गेला. रैनाने झेल पकडताच आनंद व्यक्त करत आपल्या कर्णधाराकडे धावत सुटला.

“इरफान पठाणने चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर आकमल मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मी फक्त चेंडूकडे पाहात होतो. तो चेंडू अलगदपणे माझ्या हातात आला. हा चेंडू माझ्याकडे येणार आहे याची पूर्वकल्पना राहुल द्रविडला यापूर्वीच होती. याचे मला आजही आश्चर्य वाटते. राहुल द्रविडची हीच गोष्ट मला प्रभावित करणारी आहे,” असे सुरेश रैनाने सांगितले.

33 वर्षीय रैना फॉर्मात नसल्याने सध्या संघाबाहेर आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी तो खूपच मेहनत घेत आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंगच्या संघाकडून खेळतो.

You might also like