भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी व भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांची दोस्ती जगजाहीर आहे. जवळपास एकाच वेळी भारतीय संघात पदार्पण केलेल्या जोडगोळीने पुढे अनेक वर्षे भारतीय क्रिकेटचा भार वाहिला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ससाठी एकत्रित खेळताना या दोघांची मैत्री आणखीन वृद्धिंगत झाली. मात्र, चेन्नईला आयपीएलमधून दोन वर्षासाठी निलंबित केल्यानंतर या दोघांना वेगवेगळ्या संघात खेळणे भाग पडलेले. त्यावेळचा एक मजेदार किस्सा सुरेश रैनाने एकदा सार्वजनिक केला होता.
‘या कप्तान साहेब या’
प्रसिद्ध सूत्रसंचालक गौरव कपूर याच्या एका मुलाखतीत बोलताना सुरेश रैनाने धोनीबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या होत्या. चेन्नई संघ आयपीएलमधून निलंबित झाल्यानंतर धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स तर, रैना गुजरात लायन्स संघाचा कर्णधार बनला होता.
त्या वेळचा एक किस्सा सांगताना रैना म्हणाला, “आम्ही २०१६ आयपीएलवेळी राजकोटमध्ये सामना खेळत होतो. मी फलंदाजीला आलो त्यावेळी अश्विन गोलंदाजी करत होता. ब्रेंडन मॅक्युलम नॉन-स्ट्राइकवर, धोनी यष्टीरक्षक तर, फाफ डू प्लेसिस स्लिपमध्ये उभा होता. एका संघातील सर्व सहकारी असे पाहताना वाटले की, आम्ही एखाद्या कांगा लीगमध्ये खेळत आहोत. तो एक अविस्मरणीय क्षण होता.”
रैना पुढे म्हणाला, “मी फलंदाजीला उतरल्यानंतर धोनी मला म्हणाला, या कप्तान साहेब या. यावर मीदेखील मजेशीर उत्तर देताना म्हटले, अरे हा भाई थोडा मागेच थांब.”
याव्यतिरिक्त रैनाने २०१८ मध्ये आयर्लंड दौऱ्यावर बारावा खेळाडू असलेल्या धोनीला मुद्दामहून कसा त्रास दिला, याबाबतदेखील खुलासा केला. रैनाच्या सततच्या वेगवेगळ्या मागणींना कंटाळून धोनीने सरळ त्याची किट बॅग मैदानात आणली होती.
एकाच दिवशी निवृत्ती केली जाहीर
देशासाठी अनेक अविस्मरणीय विजय मिळवून देणारे धोनी आणि रैना किती पक्के दोस्त आहेत याची प्रचिती आपल्याला तेव्हा येते जेव्हा, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात रैनाने देखील निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर, आता रैना परदेशी टी20 लीग खेळण्यासाठी आयपीएलमधूनही निवृत्त झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विमानात एअर होस्टेसने सुरेश रैनाला म्हटले होते ‘मास्टर ब्लास्टर’चा मुलगा; सचिननेही घेतली होती मजा
‘ब्लू जर्सी’त पुन्हा एकदा धमाका करणार सुरेश रैना, तेंडूलकरच्या कॅप्टन्सीखाली करणार पदार्पण!
रैना इज बॅक! सीएसकेची जर्सी घालून सरावात गाळतोय घाम; पाहा व्हिडिओ