मुंबई । कोणीतरी असं म्हटले आहे, असली बाजीगर तोच जो कठीण प्रसंगात आपला उत्साह कायम ठेवत लक्ष केंद्रीत करून बाजी मारतो. भारतीय क्रिकेट संघाचा स्टायलिश खेळाडू सुरेश रैना याला देखील आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. परिस्थितीशी दोन हात करत यश मिळवले आणि एक वेगळी उंची गाठली. तो नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
रैनाच्या आयुष्यामध्ये असाही दिवस आला होता की, त्याला कंटाळून तो आत्महत्या करण्याच्या विचारात होता. चार वर्षांपूर्वी त्याने या गोष्टीचा खुलासा करताना म्हणाला होता की, “अनेक अडचणींचा सामना करत असताना त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावत होते. पण यातून त्याने स्वतःला सावरले आणि परिस्थितीवर मात केली.”
रैना 13 वर्षांचा होता तेव्हा तो लखनऊ येथील वसतिगृहात राहायचा. वसतीगृहातले वरिष्ठ खेळाडू त्याला सतत मानसिक त्रास द्यायचे. त्यामुळे येथे राहत असताना त्याच्या मनात सतत आत्महत्येचे विचार यायचे. रैनाचे प्रशिक्षकांसोबत चांगले संबंध होते. त्यामुळे इतर खेळाडूंना त्याच्याविषयी वाईट भावना निर्माण होत होती. रैनाची कामगिरी त्यांना बघवत नव्हती.
रैनाने सांगितले की, ” अनेकदा त्यांच्या दुधाच्या बाटलीत ती मुलं गवत टाकायचे. थंडीच्या दिवसात रात्री तीन वाजता तो झोपलेला असताना त्याच्या अंगावर थंड पाणी टाकायचे. असे चुकीचे काम करणाऱ्या मुलांना मला खूप मारावसे वाटायचे. पण पण मी जर का त्यांना एक मारलं तर ते चार-पाच मुलं मला खूप मारतील या भीतीने मी त्यांना काहीच म्हणत नव्हतो.”
रैनाला हॉकीच्या स्टिकने मारले
वसतिगृहातल्या त्या मुलांनी रैनाला एकदा हॉकीच्या स्टिकने भरपूर मारले होते. रैनाच्या मित्राला इतके मारले होते की, तो चक्क कोमामध्ये जाण्याच्या स्थितीत होता. या त्रासाला कंटाळून रैनाचा एक मित्र बिल्डिंगवरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता, पण रैनाने त्याचे मतपरिवर्तन करून या गोष्टीपासून दूर केले.
आयपीएलने बदलले आयुष्य
रैना आज 180 कोटीचा मालक आहे. एकवेळ अशी होती की, त्याच्या डोक्यावर 80 लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर होता. या कर्जाविषयी खुलासा करताना २०१६मध्ये रैना म्हणाला होता की,” एकेवेळी मी खूप घाबरलो होतो. माझ्या डोक्यावर 80 लाख रूपयांचे कर्ज होते, पण आयपीएलने माझे आयुष्य बदलून गेले.”