इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला रविवारपासून (१९ सप्टेंबर) दुबई येथे सुरुवात झाली. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात आमने-सामने आले. अडखळत्या सुरुवातीनंतर चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर १५६ धावा धावा धावफलकावर लावल्या. ऋतुराजच्या या अप्रतिम खेळीनंतर मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याने केलेल्या एका कृतीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
ऋतुराजची एकाकी झुंज
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नईची दयनीय अवस्था झाली होती. फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना व कर्णधार धोनी हे पावर प्लेमध्ये अवघ्या २४ धावा काढून तंबूत परतल्यानंतर ऋतुराजने चेन्नईच्या डावाची जबाबदारी घेतली. मुंबईच्या गोलंदाजांचा झुंजारपणे सामना करत त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवला. ५७ चेंडूत ९ चौकार व ४ षटकार ठोकत त्याने नाबाद ८८ धावांची खेळी केली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सहावे सातपुते. तसेच, ही त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
सुर्यकुमारने जिंकली सर्वांची मन
ऋतुराज गायकवाडने केलेले अप्रतिम खेळीनंतर तो पॅव्हिलियनकडे परतत असताना मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार याने केलेल्या कृतीमुळे सर्वांनी त्याचे कौतुक केले. ऋतुराज मैदानाबाहेर चालला असताना सूर्यकुमारने त्याच्या पाठीवर थाप देत त्याचे अभिनंदन केले. सूर्यकुमार यादवच्या या कृतीमुळे मुंबई इंडियन्सला आयपीएल फेअर प्ले अवॉर्ड क्रमवारीत नक्कीच फायदा होईल.
चेन्नईची पहिल्या स्थानी झेप
अडखळत्या सुरुवातीनंतर ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक व ड्वेन ब्रावो आणि रवींद्र जडेजा यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर चेन्नईने १५७ धावांचे लक्ष मुंबईसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांना धावांची गती राखता आली नाही. मुंबईचे सर्व प्रमुख फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. अनुभवी सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावून मुंबईसाठी सर्वाधिक धावा बनविल्या. मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. चेन्नईने अखेरीस २० धावांनी विजय संपादन केला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
बॅटही तुटली अन् विकेटही गमावली, ट्रेंट बोल्टने ‘असे’ केले सुरेश रैनाला बाद; पाहा व्हिडिओ
वयाच्या २३ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालाय ‘राशिद खान’
‘सब्जी नही पोहे बनेंगे’, शिखर धवन-पृथ्वी शॉ जोडीचा भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल