भारताचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादव इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आयपीएलच्या या हंगामात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने काही सामन्यात स्वतःच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला. फक्त आयपीएलमध्येच नव्हे, तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे. मात्र असे असूनही त्याची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली नाही.
भारतीय संघाची घोषणा झाली, त्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार व भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये होते. काही वेळानंतर सूर्यकुमारने रोहितशी चर्चा केली. या चर्चेचा खुलासा रोहितने केला आहे.
संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार निराश होता- रोहित
रोहित शर्मा याने टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की “जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा मी आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार निराश झाला होता. मी त्या क्षणी सूर्यकुमारकडे गेलो नाही. मी त्याला काही वेळासाठी एकटं सोडलं.”
निराशेतून बाहेर येऊन मुंबईला विजय मिळवून देईल
रोहित शर्माने सांगितले की थोड्या वेळाने सूर्यकुमार यादव त्याच्याकडे आला आणि त्याने सांगितले की तो या निराशेतून लवकरच बाहेर पडेल आणि मुंबई इंडियन्सला आणखी सामने जिंकवून देईल.
याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “भारतीय संघाच्या घोषणेनंतर मी सूर्यकुमारसोबात बोलण्यासाठी गेलो नाही. त्यानंतर तो स्वत: माझ्याकडे आला आणि म्हणाला की काहीही हरकत नाही, मी लवकरच यातून बाहेर पडेल आणि मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारतात परतण्यापूर्वी विराट करणार काहीतरी खास’, ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज खेळाडूचे भाकीत
…म्हणून मुंबईच्या प्रशिक्षकाला नकोय ‘मेगा ऑक्शन’