कालपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पंजाबने कर्नाटकाचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत सर्वप्रथम स्थान पटकाविले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूने आपला शानदार फॉर्म कायम राखत हिमाचल प्रदेशला पराभूत केले. यासह उपांत्य फेरीत पोहोचणारा तामिळनाडू दुसरा संघ ठरला.
तामिळनाडूची प्रभावी गोलंदाजी
या सामन्यात नाणेफेक जिंकून तामिळनाडूचा कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिमाचलच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात सावध केली होती. मात्र तामिळनाडूच्या गोलंदाजांनी त्यानंतर नियमित अंतराने बळी घेतले. हिमाचल प्रदेशकडून एकही फलंदाज मोठी खेळी उभारू शकला नाही. त्यामुळे निर्धारित २० षटकात त्यांनी ९ बाद १३५ धावा उभारल्या.
हिमाचलकडून कर्णधार रिशी धवनने सर्वाधिक २६ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर अभिमन्यू राणाने २६ चेंडूत २८ धावा केल्या. तामिळनाडूकडून सोनू यादव सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात केवळ १४ धावा देत ३ बळी घेतले. त्याला संदीप वाॅरियरने ३२ धावांत २ बळी घेत सुयोग्य साथ दिली.
After the bowlers restricted Himachal to 135/9, Baba Aparajith & Shahrukh Khan starred with the bat to power Tamil Nadu into the semifinals. 👏👏#TNvHP
Watch the highlights of the #SyedMushtaqAliT20 #QF2 🎥👇https://t.co/j0wMeWm3Db pic.twitter.com/55QyZw4LFT
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 26, 2021
शाहरूख खान, बाबा अपराजित चमकले
या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरुवात अडखळत झाली. ४ षटकांनंतर ३ बाद २५ अशी तामिळनाडूची अवस्था होती. मात्र त्यानंतर बाबा अपराजितने सोनू यादवसह ३५ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी स्थिरावतेय असे वाटत असतांनाच पंकज जयस्वालने सोनू यादवला बाद केले. त्यापाठोपाठ फलंदाजीला आलेला कर्णधार दिनेश कार्तिकही अवघ्या २ धावा काढून तंबूत परतला.
५ बाद ६६ अशा नाजूक अवस्थेतून सावरणे तामिळनाडूला आता कठीण जाणार असे वाटू लागल्याने सामन्याचे पारडे हिमाचल प्रदेशच्या बाजूने झुकले होते. परंतु सातव्या क्रमांकावर आलेल्या शाहरूख खानने तुफानी खेळी करत सामना तामिळनाडूच्या बाजूने झुकवला. त्याने १९ चेंडूत ४० धावांची वादळी खेळी उभारली. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या बाबा अपराजितने संयमी खेळी करत ४५ चेंडूत नाबाद ५२ धावा काढल्या. १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अपराजितने षटकार मारत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हिमाचल प्रदेशकडून वैभव अरोराने सर्वाधिक ३ बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल
ब्रेकिंग! आयपीएल २०२१ लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरले; फेब्रुवारीत या दिवशी होणार लिलाव
Video : कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे खेळाडू चेन्नईत पोहचले; खेळाडूंची झाली कोविड चाचणी