भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. तसेच येत्या १२ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. परंतु ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी पुढे आली आहे. संघातील स्टार गोलंदाज टी नटराजन पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे.
यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे तिकीट प्राप्त करणारा, युवा गोलंदाज नटराजन हा दुखापतीमुळे पहिल्या टी२० सामन्यातून बाहेर होऊ शकतो. कारण १२ मार्चपासून पहिला टी२० सामना खेळला जाणार आहे.
सध्या नटराजन बंगळुरूमध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीमध्ये दुखापतीतून बाहेर येण्यासाठी पुनर्वसन प्रक्रियेत आहे. तो यातून पूर्णपणे केव्हा बाहेर येईल? हे अजुनही अस्पष्ट आहे. त्यामुळे नटराजनचे पहिल्या टी२० सामन्यात खेळणे कठीण दिसून येत आहे. याबाबत बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून केलेल्या दमदार कामगिरीमुळे नटराजनला ‘यॉर्कर किंग’ नाव मिळाले आहे. अनेक फलंदाजांना त्याने आपल्या यॉर्कर चेंडूवर बाद केले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने भारतीय संघाला सामने जिंकवून दिले होते. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या ३ टी२० सामन्यात ६ गडी बाद केले होते. अशात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत नटराजन भारतीय टी२० संघात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
बुमराहने वैयक्तिक कारणामुळे अखेरच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. अशात तो टी२० मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून विराट-रोहित एक पाऊल दूर, कोण मारणार बाजी?
आयपीएल २०२१: जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ संघात होणार चढाओढ, अंतिम फेरीचे असतील प्रमुख दावेदार
सचिन-सेहवाग सपशेल फ्लॉप, इरफानची एकाकी झुंज; तरीही इंडिया लीजेंड्सचा ६ धावांनी पराभव