आयपीएल २०२० च्या समाप्तीनंतर, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुबईमार्गे सिडनी येथे दाखल झाला. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवान गोलंदाज टी. नटराजन यालादेखील भारतीय टी२० संघात स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी नटराजनने आपला एक नवस पूर्ण केला. नटराजनच्या पत्नीने मुलीला जन्म दिल्यानंतर, त्याने अडीच महिन्यानंतर दाढी करुन आपला नवस फेडला.
मुलगी माझ्यासाठी भाग्यशाली ठरली.
नटराजन आयपीएल २०२० गाजवत असतानाच त्याची पत्नी पवित्रा हिने एका मुलीला जन्म दिला होता. पाठोपाठ, नटराजनची भारतीय संघात निवड देखील झाली.
डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या जन्माबद्दल व भारतीय संघातील निवडीविषयी प्रतिक्रिया देताना नटराजन म्हणाला, “मुलीचा जन्म माझ्यासाठी खूप भाग्यशाली ठरला. तिने या जगात पाऊल ठेवले आणि माझी निवड राष्ट्रीय संघात झाली. यासारखी आनंदाची गोष्ट कुठलीच असू शकत नाही. मी अजूनही तिला प्रत्यक्षात पाहिली नाही. फक्त व्हिडिओ कॉलद्वारे मी तिचा चेहरा पाहू शकलो आहे.”
प्रशिक्षकांनी दिली नवसाची माहिती
नटराजनचे स्थानिक प्रशिक्षक भरत रेड्डी यांनी सांगितले की, “नटराजनने नवस केला होता की, आपल्या अपत्याचा जन्म होत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही. त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिल्यानंतर त्याने हा नवस पूर्ण केला. खरंतर, त्याला मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे होते. मात्र, तो दुबईत असल्याने तो मंदिरात जाऊ शकला नाही. त्याने, हॉटेल रूममध्येच पूजा करत हा नवस फेडला.”
आयपीएल गाजवत बनला ‘नवा यॉर्कर किंग’
आयपीएल २०२० मधील कामगिरीमुळे नटराजनला भारतीय संघासोबत राखीव गोलंदाज म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, टी२० संघात निवड झालेल्या वरूण चक्रवर्तीला खांद्याची दुखापत झाल्याने, त्याच्या जागी नटराजनला संघात संधी मिळाली.
नटराजनने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी १६ सामने खेळताना १६ बळी आपल्या नावे केले होते. जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, कागिसो रबाडा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा अधिक यॉर्कर चेंडू टाकून त्याने सर्वांची वाहवा मिळवली होती. अनेकांनी त्याला ‘नवा यॉर्कर किंग’ अशी उपाधी दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
AUS v IND – “मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू”, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले भारतीय क्रिकेटरचे कौतुक
ट्रेंडिंग लेख –
…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!
…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’