इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जगभरातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशात आयपीएल 2023 स्पर्धा संपल्यानतर अनेक खेळाडू आपापल्या मायदेशी परतले. काही जण वेगळ्या टी20 लीग स्पर्धांमध्ये सहभागी झाले. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे अफगाणिस्तानचा अष्टपैलू नवीन उल हक होय. नवीन आयपीएलमधून बाहेर पडताच इंग्लंडच्या टी20 ब्लास्ट स्पर्धेत खेळताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 02 जून) त्याने वादळी फलंदाजी केली.
टी20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेतील एक सामना नॉर्थम्पटनशायर विरुद्ध लीसेस्टरशायर (Northamptonshire vs Leicestershire) संघात पार पडला. या सामन्यात नवीन उल हक (Naveen ul Haq) याने लीसेस्टरशायर संघाकडून खेळताना बॅटमधून वादळ आणले. नॉर्थम्पटनशायर संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नवीनने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या अंदाजात जबरदस्त फटकेबाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यानचा नवीनचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Naveen-ul-Haq smashed 25 from just 8 balls against the Northamptonshire Steelbacks 🔥
That innings featured a four and three powerful sixes 💪#Blast23 pic.twitter.com/uWHkLBgaDl
— Vitality Blast (@VitalityBlast) June 2, 2023
नवीनने या सामन्यात फक्त 8 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 1 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत 312.50च्या स्ट्राईक रेटने नाबाद 25 धावा चोपल्या. यादरम्यान त्याने सूर्याच्या अंदाजात स्कूप शॉट खेळून थर्ड मॅनच्या दिशेने जबरदस्त षटकारही ठोकला. बेधडक फलंदाजी करताना त्याने गगनचुंबी षटकारही मारला. त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर लीसेस्टरशायर संघाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 164 धावा केल्या. यानंतर त्याने गोलंदाजीतही कमाल केली. नवीनने 4 षटकांमध्ये फक्त 26 धावा खर्च करत 1 विकेट नावावर केली.
ख्रिस लिनची जबरदस्त फलंदाजी
असे असले, तरीही नवीन आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नॉर्थम्पटनशायर संघाचा सलामीवीर ख्रिस लिन याने 68 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडत 110 धावा चोपल्या. तसेच, संघाला 18.5 षटकातच विजय मिळवून दिला.
आयपीएलमध्ये चर्चेत होता नवीन
नवीनविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा भाग होता. यादरम्यान त्याची विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी बाचाबाची झाली होती. त्यांच्यातील हा वाद देशभरात गाजला होता. नवीनच्या आयपीएल कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याला बॅटमधून काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने 8 सामन्यात फक्त 16 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त गोलंदाजीत त्याने 8 सामने खेळताना 11 विकेट्स नावावर केल्या होत्या. (t20 blast cricketer naveen ul haq smashes 25 runs in 8 balls including 3 sixes see video )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सर्वजण सचिनबद्दल बोलतात, पण आशियात तोच सर्वोत्तम…’, सेहवागने गायले पाकिस्तानी खेळाडूचे गोडवे
जगातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेत मॅनचेस्टर सिटीचा दणदणीत विजय, फायनलला विराट-अनुष्कासह गिलही हजर