प्रज्ञा, ओम् ज्ञानदीप, जिजामाता यांनी आर्य सेवा मंडळ आयोजित “८३व्या कबड्डी क्रीडा महोत्सवातील” महिलांत विजयी सलामी दिली. मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने ताडदेव येथील आर्य नगरात आजपासून सुरू झालेल्या महिलांच्या उदघाटनिय सामन्यात शिवडीच्या प्रज्ञा स्पोर्ट्स क्लबने धारावी महिला संघाचा ५०-१८ असा पाडाव केला.
प्रीती पवार, आकांक्षा घाटकर यांनी सुरुवातीपासून चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत मध्यांतराला ३०-१३अशी भक्कम आघाडी घेतली होती. धारावीच्या निकिता व्यंकटेश हिने एका चढाईत ४ गडी टिपत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो क्षणिक ठरला.
दुसऱ्या सामन्यात प्रभादेवीच्या ओम ज्ञानदीपने आर्य मंडळाचा ५०-११असा धुव्वा उडविला. मध्यांतराला २८-०७अशी आघाडी घेणाऱ्या ओम ज्ञानदीपच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या आचल यादव, सुप्रिया पाल.
आर्यच्या कोमल यादवने एका चढाईत ३ गडी टिपत थोडाफार प्रतिकार केला. शेवटच्या सामन्यात काळाचौकीच्या जिजामाताने प्रभादेवीच्या चंद्रोदयला ५०-२१ असे नमविलें. विश्रांतीपर्यंत ३४-१४ अशी आघाडी घेणाऱ्या जिजामाताने नंतर मात्र संथ खेळ केला. प्रिया हांदे, योगिता राऊत यांच्या उत्कृष्ट चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. गुंजन शेटे, तेजश्री पाटील चंद्रोदय कडून बऱ्या खेळल्या.
या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक नगरसेविका सौ. अरुंधती दुधवाडकर यांच्या हस्ते झाले. तदप्रसंगी माजी नगरसेवक अरुण दुधवाडकर, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, दिगंबर शिरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन
–मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना
–टीम इंडिया विरुद्धच्या निर्णायक वनडेसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ